
मुंबईतील प्रतिष्ठीत एनएम महाविद्यालयाचे प्राध्यापक आलोक सिंग यांची मालाड रेल्वे स्थानकात हत्या करण्यात आली. अगदी शुल्लक गोष्टीवर झालेला वाद इतका टोकाला पोहोचला की आरोपी ओमकार शिंदेने थेट आलोक यांचा जीव घेतला. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आलोक सिंग यांच्या वडिलांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांचे लक्ष वधले आहे. तसेच ते एका बड्या मंत्र्यासाठी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत.
मालाड रेल्वे स्थानकावर हत्या झालेल्या आलोक सिंगचे वडील अनिल सिंग हे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांचे सुरक्षा रक्षक आहेत. आलोक सिंगच्या कुटुंबात सध्या शोककळा पसरली आहे, त्याचे वडील, बहीण आणि पत्नी हे सर्वजण धक्क्यात आहेत. घटनेच्या दिवशी आलोक सिंगच्या पत्नीचा वाढदिवस होता आणि त्याच्या पत्नीने आलोक सिंगला फोन करून वाढदिवस साजरा करण्यासाठी लवकर घरी येण्यास सांगितले होते. मात्र, घरी पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे.
वडिलांनी काय केला आरोप?
आलोकचे वडील अनिल सिंग यांनी मुलाच्या निधनाच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देत म्हटले की, आलोक सिंग हा एक साधा मुलगा होता आणि त्याचे कोणाशीही भांडण नव्हते. त्याला रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला. पुढे आलोक सिंगच्या बहिणीने सांगितले की ते लहानपणापासून एकत्र होते, तो खूप साधा मुलगा होता. आम्ही दोघेही शिक्षक आहोत. आलोकच्या पत्नीचा वाढदिवस होता.
आलोक सिंगचे वडील कमांडो आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे सुरक्षा रक्षक आहेत, त्यांची पत्नी पूजा शिक्षिका आहे. आलोकचे काका आणि बहीण देखील शिक्षिक आहेत. २४ तारखेला संध्याकाळी ७ वाजता आलोकच्या शिक्षक मित्राने त्याला फोन केला. त्याने आलोकचा फोन केला तेव्हा पोलिसांनी तो उचलला आणि त्याला त्याची माहिती मिळाली. त्याचे लग्न फक्त दोन वर्षांपूर्वी झाले होते. आलोकच्या काकांनी सांगितले की त्यांनी मुंबईत अशी घटना कधीच पाहिली नव्हती.
कपड्यावर रक्ताचे डाग नाहीत
दरम्यान, आरोपीच्या वकिलाने मीडियाशीही संवाद साधला. वाद विवाद होणे, हत्या होणे हे दोन वेगळे भाग आहेत. गर्दीत किरकोळ वादावादी झाली. फिर्यादीने एफआयआर दिला आहे. तो साक्षीदार आहे. या व्यक्तीने मारलाय, असं त्यात म्हटलं नाही. मला फक्त काही तरी मारलं. एवढंच वाक्य आहे. फिर्यादी आरोपीच्या मागे पळत गेला म्हणून आरोपी पळालेला आहे. जर हत्यार असतं तर हत्यार घेऊन पळाला असता. आरोपीच्या अंगावर, कपड्यावर रक्ताचे डाग नाहीत हे सीसीटीव्हीत दिसतं. लोकलमध्ये एकाच घरातील व्यक्ती नसतात. कडिया काम करणारे, इतर कामगार असतात. त्यांच्यासोबत अवजारं असतात. अवजारं गर्दीत लागू शकतात. आरोपीकडे हत्यार असते तर ते आरोपीच्या हातात किंवा घटनास्थळी मिळाले असते, असं आरोपीच्या वकिलाने म्हटलंय.