भारतावर नवं संकट, खतरनाक निपाह व्हायरसची एन्ट्री, काय आहेत लक्षणे?
Nipah Virus : खतरनाक निपाह व्हायरसने भारतात एन्ट्री केली आहे. पश्चिम बंगालमध्ये निपाह विषाणूचे दोन रुग्ण आढळले आहेत. या दोन्ही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

भारतावर आणखी एक नवं संकट ओढवले आहे. खतरनाक निपाह व्हायरसने भारतात एन्ट्री केली आहे. पश्चिम बंगालमध्ये निपाह विषाणूचे दोन रुग्ण आढळले आहेत. या दोन्ही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने या घटनेची दखल घेत राष्ट्रीय संयुक्त उद्रेक प्रतिसाद पथक बंगालमध्ये पाठवले आहे. बंगालमध्ये रुग्ण आढळल्यानंतर आता इतर राज्यांमध्येही या विषाणूचा धोका वाढला आहे. हा विषाणू नेमका काय आहे? तो किती घातक आहे? याची लक्षणे काय आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
लेडी हार्डिंग हॉस्पिटलमधील औषध विभागातील डॉ. घोटेकर यांनी निपाह विषाणूबद्दल माहिती दिली आहे. डॉ. घोटेकर म्हणाले की, हा विषाणू प्रामुख्याने फळे खाणाऱ्या वटवाघळांमध्ये आढळतो आणि तेथून मानवांमध्ये किंवा प्राण्यांमध्ये पसरतो. संक्रमित वटवाघूळाने खालेले फळ जर एखाद्या व्यक्तीने खाल्ले तर हा विषाणू मानवांमध्ये पसरतो. एकदा संसर्ग झाल्यानंतर हा विषाणू दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होतो. अशाप्रकारे याचा प्रसार होतो.
हा विषाणू किती धोकादायक आहे?
डॉ. घोटेकर यांनी सांगितले की, निपाह विषाणू इतर विषाणूंपेक्षा जास्त धोकादायक आहे. या विषाणूचा मृत्युदर 40 ते 75 टक्के इतका असू शकतो. हा विषाणू मेंदूवर लवकर हल्ला करतो, यामुळे रुग्ण कोमातही जाऊ शकतो. त्यामुळे त्याचा जीव वाचणे कठीण होते. या विषाणूसाठी अद्याप कोणतेही औषध किंवा लस विकसित झालेली नाही, त्यामुळे धोका आणखी वाढतो. हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये देखील पसरू शकतो, त्यामुळे तो वेगाने पसरू शकतो. त्यामुळे लोकांना या विषाणूच्या लक्षणांबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
निपाह विषाणूची लक्षणे
- तीव्र डोकेदुखी
- ताप
- उलट्या आणि चक्कर येणे
- घसा खवखवणे
- लोक बेशुद्ध पडू शकतात
या विषाणूला कसे रोखायचे?
- फणस खाणे टाळा
- लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा
- संक्रमित रुग्णांपासून दूर रहा आणि मास्क वापरा
- ज्या भागात विषाणूची प्रकरणे नोंदवली गेली आहेत अशा ठिकाणी प्रवास करणे टाळा.
