ऑडिओ क्लिपचा बॉम्ब… जरांगेंच्या आरोपानंतर शिंदे गटाचा मोठा निर्णय; थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना…

मनोज जरांगे पाटील यांनी टाकलेल्या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, ज्यात ५०० कोटी रुपयांच्या कथित आरोपांचा समावेश आहे. शिंदे गटाने हे आरोप फेटाळले असून, या क्लिपची सखोल चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे, आणि भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ऑडिओ क्लिपचा बॉम्ब... जरांगेंच्या आरोपानंतर शिंदे गटाचा मोठा निर्णय; थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना...
manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 22, 2026 | 1:52 PM

मनोज जरांगे पाटील यांनी आज ऑडिओ क्लिपचा बॉम्ब टाकून एकच खळबळ उडवून दिली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये अनेक धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. 500 कोटींच्या आरोपांपासून ते राज्यातील वातावरण दुषित करण्यापर्यंतच्या षडयंत्रांचा खुलासा या क्लिपमध्ये झाला आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली असून त्याचाच एक भाग म्हणून शिंदे गटाच्या नेत्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे गटाचे नेते आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचं एक शिष्टमंडळ आज संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. या कथित क्लिपची चौकशी करण्याची मागणी यावेळी केली जाणार आहे. एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेंना देण्यासाठी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा दावा या कथित क्लिपमध्ये करण्यात आला आहे. श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत हे पैसे देण्यात आल्याचं त्यात म्हटलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. शिंदे गटाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. त्यानुषंगानेच शिंदे गटाचे नेते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या क्लिपची चौकशी करण्याची मागणी करणार आहेत.

Loading...

आरेला कारे करणारच

दरम्यान, या प्रकरणावर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांनी फॉरेन्सिक लॅबकडे तक्रार केली पाहिजे. त्यांनी मागणी केली तर त्या प्रकरणाचा राज्य सरकार तपास करेल. एकनाथ शिंदे कधीच कुणाला कुणाच्या विरोधात लढायला सांगत नाहीत. त्यांचा तो स्वभाव नाही. मनोज जरांगे यांचा आम्ही कायम आदर करतो. आता या सगळ्या गोष्टीची चौकशी केली जावी, अशी आमची मागणी आहे. एकनाथ शिंदे यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे जर त्यांच्यावर कोणी बोलला तर आरे ला का रे आम्ही करणारच, असा इशारा नरेश म्हस्के यांनी दिला आहे.

अशा चर्चा होतच असतात

भाजपचे नेते नितेश राणे यावर ट्विट केलं आहे. कोणतरी बोलणार, एकाकडून घेऊन दुसऱ्याला 500 करोड दिले म्हणजे पुरावा झाला? रोज आमच्या कोकणाच्या कुठल्या ना कुठल्या टीट्यावर अमुकाने पैसे घेतले आणि अमुकाने पैसे दिले अशी रोज चर्चा होते, त्याचा बोलणाऱ्याला पण फरक पडत नाही आणि ऐकणाऱ्याला पण. कारण कोणाकडून तरी ऐकलेलं असते. जरांगे पाटील जरा तरी माणुसकी आणि लाज स्वतःमध्ये जिवंत असायला पाहिजे होती, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us