‘स्वराज्य रक्षक संभाजी’मधील अभिनेत्रीचं हॉटेल, 40 रुपयांत भरपेट जेवण

| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

मुंबई: मुंबईसारख्या शहरात दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून अनेकांना 12-12 तास ऊन-वारा-पाऊस कशाचीही तमा न बाळगता भटकंती करावी लागते. अनेक नामांकित हॉटेल्समध्ये पोटभर जेवण जेवण्यासाठी आपल्याला चांगलेच पैसे मोजावे लागतात. पण एक अशी व्यक्ती आहे की जिने सामाजिक भान जपत केवळ 40 रुपयांमध्ये भरपेट जेवण मिळेल अशी व्यवस्था केली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका स्वराज्य […]

स्वराज्य रक्षक संभाजीमधील अभिनेत्रीचं हॉटेल, 40 रुपयांत भरपेट जेवण
Follow us on

मुंबई: मुंबईसारख्या शहरात दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून अनेकांना 12-12 तास ऊन-वारा-पाऊस कशाचीही तमा न बाळगता भटकंती करावी लागते. अनेक नामांकित हॉटेल्समध्ये पोटभर जेवण जेवण्यासाठी आपल्याला चांगलेच पैसे मोजावे लागतात. पण एक अशी व्यक्ती आहे की जिने सामाजिक भान जपत केवळ 40 रुपयांमध्ये भरपेट जेवण मिळेल अशी व्यवस्था केली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये राणू अक्काची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेने स्वत:चे नवीन हॉटेल सुरु केलं आहे.

सामाजिक भान जपत अश्विनीनं ‘स्वराज्य परिपूर्ण किचन’ हे हॉटेल सुरु केले आहे. स्वराज्य परिपूर्ण किचनमध्ये ‘स्वराज्य थाळी’ ही खास थाळी तुम्हाला मिळणार आहे. या थाळीचं वैशिष्ट्य म्हणजे ही थाळी फक्त 40 रुपयांना आहे. संपूर्ण जेवण तेही फक्त 40 रुपयांना ऐकून नवलं वाटलं ना…पण ते साहाजिकच आहे. कारण आजच्या महागाईच्या दिवसांत 40 रुपयांमध्ये जेवणाची परिपूर्ण थाळी मिळणं हे थोडं कठीणच आहे.

पण अश्विनीने सुरु केलेल्या ‘स्वराज्य परिपूर्ण किचन’ या हॉटेलमध्ये ‘स्वराज्य थाळी’ मिळणार आहे. या थाळीमध्ये दोन चपात्या, दोन प्रकारच्या भाज्या, वरण-भात, पापड, कोशिंबीर, एक गोड पदार्थ आणि ताक अशा स्वादिष्ट मेनूचा समावेश आहे. बरं या सगळ्यामध्ये आवर्जून सांगायचं म्हणजे ही थाळी तुम्हाला अवघ्या 40 रुपयांमध्ये मिळणार आहे. हे ‘पोटभर’ जेवण मिळतंय…

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमुळं आपल्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला आहे. या मालिकेमुळे हा उपक्रम सुरु करण्यासाठी प्रेरणा मिळाली असे अश्विनीने सांगितले. तसेच स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका अनेकांचं प्रेरणास्त्रोत आहे. या मालिकेमुळं आपले विचार बदलले आणि शिवविचारांचे पैलू मनात रुजले. लोकांसाठी काहीतरी करावं या उद्देशानंच मी रयतेच स्वराज्य परिपूर्ण किचन सुरु केलंय, असे अश्विनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाली.

या उपक्रमासाठी अश्विनी आणि तिच्या टीमचं या उपक्रमासाठी अनेक स्तरांवरुन कौतुक केलं जातंय. या उपक्रमासाठी सोशल मीडियावरुनही तिला उत्तम प्रतिक्रिया मिळत आहेत. विशेष म्हणजे स्वराज्य परिपूर्ण किचनच्या इतर शाखांसाठीही तिला विचारणा केली जातेय.

सध्या स्वराज्य परिपूर्ण किचनची शाखा मीरारोडला आहे. स्वराज्य परिपूर्ण किचनच्या माध्यमातून अनेक बेघरांना मोफत जेवणही दिलं जातं. या भागात मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळं लवकरच दुसरी शाखाही सुरु करण्यात येणार आहे. एका वर्षात संपूर्ण मुंबईत स्वराज्य परिपूर्ण किचनच्या जास्तीत जास्त शाखा सुरु करण्याचं आश्विनी आणि तिच्या टीमचं स्वप्न आहे.

अश्विनीला याआधी आपण बऱ्याच मालिकांमध्ये पाहिलंय. अस्मिता मालिकेतली मनाली ही आजही आपल्या लक्षात आहे. मात्र अश्विनीला स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतली राणूबाईची भूमिकेनं खऱ्या अर्थानं ओळख मिळवून दिली. राणुबाई म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची मोठी बहिण. राणुबाईंचं बोलणं, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज हे प्रभावित करणारं, हे तंतोतंत ओळखून अभिनेत्री अश्विनी महांगडे या भूमिकेसाठी जीव ओतून काम करतेय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही… भरजरी साडी, वजनदार दागिने, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळं राणूबाईंची भूमिका आणखी उठून दिसते.

अश्निनी महांगडे ही मूळची साताऱ्याची. अश्विनीनं पदवीचं शिक्षण करतानाच हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्सही केला. आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अश्विनी मुंबईत आली. नाटकांमध्ये काम करुन तिनं आपल्या अभिनयातील करिअरची सुरुवात केली. नाटक, मालिका आणि वेबसिरीजमध्ये काम करुन अश्विनी प्रेश्रकांचं मनोरंजन करतेय. एवढं असूनही तिचे पाय अजूनही जमिनीवर आहेत हे विशेष. अश्विनीला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

पाहा व्हीडिओ: