BREAKING | शिंदे-फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरु, बैठकीला आणखी तिसरी व्यक्ती हजर

| Updated on: Jun 15, 2023 | 8:22 PM

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहावर घडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीकांत शिंदे या तीन नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा होत असल्याची माहिती मिळत आहे.

BREAKING | शिंदे-फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरु, बैठकीला आणखी तिसरी व्यक्ती हजर
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहावर घडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीकांत शिंदे या तीन नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा होत असल्याची माहिती मिळत आहे. जाहिरातीच्या वादानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरु आहे. विशेष म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे देखील या बैठकीत आहेत, अशीदेखील माहिती समोर आली आहे. जाहिरातीच्या वादानंतर शिंदे आणि फडणवीस यांची ही पहिली बैठक आहे. जाहिरातीच्या वादानंतर शिंदे-फडणवीस आज सकाळी पालघरच्या कार्यक्रमात दोघे एकत्र होते. त्यानंतर आता दोन्ही नेत्यांची बैठक पार पडत आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघात युतीला तडा पाडणारी घटना घडली. एका पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीच्या मागणीसाठी कल्याणच्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली. संबंधित अधिकाऱ्याची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहकार्य करायचा नाही, असा ठरावच मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमक्ष भाजप नेत्यांनी करुन घेतला.

श्रीकांत शिंदे यांच्याकडून संताप व्यक्त

या सगळ्या घडामोडींवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी संताप व्यक्त केला. युतीसाठी आपण आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहोत. आपली खासदारकी युतीत बाधा येत असेल तर आपण राजीनामा द्यायला तयार असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले. त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षात कार्यकर्त्यांचं ऐकलं जातं, असं रवींद्र चव्हाण म्हणाले.

हे सुद्धा वाचा

श्रीकांत शिंदे अचानक दिल्लीला रवाना

कल्याणमधील शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील वादाची दखल राज्य पातळीवरील बड्या नेत्यांनी घेतली. पण तरीदेखील वाद मिटायचं नाव घेताना दिसला नाही. त्यानंतर श्रीकांत शिंदे हे अचानकपणे दिल्लीला गेले. तिथे त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा समोर आली. पण श्रीकांत शिंदे यांनी मुंबईत परतल्यानंतर या चर्चांचं खंडन केलं. आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटलो नाही. आपण वैयक्तिक कामांसाठी दिल्लीला गेलो होतो, असं श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं.

‘त्या’ जाहिरातीमुळे युतीत दुसरा खडा

या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना भाजप-शिवसेना युतीत खडा पाडणारी एक जाहिरात समोर आली. संबंधित जाहिरात ही शिवसेनेकडून वृत्तपत्रात छापून आणण्यात आली होती. राष्ट्रात मोदी, तर महाराष्ट्रात शिंदे अशा आशयाखाली ही जाहिरात छापण्यात आली. या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा एकनाथ शिंदे यांची जास्त लोकप्रियता असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे भाजपच्या गोटात नाराजी पसरली. विशेष म्हणजे जाहिरात छापून आली त्यादिवशी शिंदे-फडणवीस यांचा एकत्र कोल्हापूर दौरा होता. पण फडणवीसांनी नागपूर दौऱ्यावर जाणं टाळलं.

दोन्ही बाजूने टोकाची टीका

शिवसेनेच्या जाहिरातींवर प्रवीण दरेकर यांनी कडक शब्दांत टीका केली. त्यानंतर खासदार अनिल बोंडे यांनी भाजपकडून सडकून टीका केली. यावेळी त्यांनी बेडकाचा उल्लेख केला. अनिल बोंडे यांच्या या टीकेनंतर शिवसेनेकडूनही आक्रमक प्रतिक्रिया येऊ लागल्या. आमदार संजय गायकवाड यांनी तर थेट औकातीची भाषा केली. दोन्ही बाजूने टीका-टीप्पणी सुरु झाली. वाद पेटू लागलेला. पण नंतर दोन्ही बाजूने वाद शमवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. नंतर दोन्ही बाजूने संयमाने विषय हाताळण्यात आले. शिवसेनेकडून दुसऱ्यादिवशी नवी जाहिरात छापण्यात आली. त्यामध्ये शिंदे-फडणवीस यांचा एकत्रित फोटो दाखवण्यात आला.

‘युतीत आधीसारखा सन्मान मिळत नाही’, शिवसेना आमदारांची तक्रार

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिरात छापून येण्याच्या एक दिवस आधी शिवसेनेच्या सर्व आमदार-खासदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना आमदारांनी आपली नाराजी व्यक्त केली. शिवसेना आणि भाजपची आधी युती होती तेव्हा जसा सन्मान केला जायचा तसा सन्मान आता भाजपकडून केला जात नाही, अशी तक्रार शिवसेना आमदारांनी केली.

दुसरीकडे भाजपकडून लोकसभेच्या निवडणुकीबाबत जागावाटपाबद्दल चर्चा झालेली नाही. तरीदेखील भाजपकडून वेगवेगळ्या मतदारसंघात दावा केला जातोय. त्यामुळे देखील शिवसेना नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. या सगळ्या तक्रारींवर आता सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा होत असल्याची माहिती मिळत आहे.