Pratap Sarnaik: भाजप नेत्याची आमदारकी रद्द करा… मंत्री प्रताप सरनाईक यांची राज्यपालांकडे मोठी मागणी, महायुतीत का पडला मीठाचा खडा?
Pratap Sarnaik Demand to BJP Resignation: महायुतीत सर्वकाही अलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट या भाजप नेत्याची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.

Pratap Sarnaik BJP MLA Narendra Mehta: राज्याचे परिवहन मंत्री आणि शिंदे सेनेचे शिलेदार प्रताप सरनाईक यांनी मिरा-भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्यांना अयोग्य ठरवत राजीनामा घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. सोमवारी त्यांनी माध्यमांसमोर येत याविषयीची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस अधिकाऱ्यांनाही त्यांनी याविषयीचे एक पत्र पाठवले आहे.
या पत्रात आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्यानुसार, 16 ऑक्टोबर रोजी मेहता यांनी 40-50 नगरसेवक आणि हजारो समर्थकांसह मिरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या निवासस्थानी धडकले. त्यांच्यासह या जमावाने शर्मा यांच्या कुटुंबियांना भीती घालण्याचा प्रयत्न केला. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी मेहता हे पालिका आयुक्तांवर दबाव टाकत असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे.
नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करा
सरनाईक यांनी नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करणे, आरोपींची अटक आणि आयएएस अधिकाऱ्यांना धमकी प्रकरणात स्वतंत्र विशेष समितीकडून निष्पक्ष तपास करण्याची मागणी सरनाईक यांनी केली. याप्रकरणी थेट कारवाई होत नसल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनोबल खचले आहे. लोकशाहीत अधिकाऱ्यांना संरक्षण नसल्याचा आरोपही त्यांनी केला. तर याप्रकरणी तातडीने कारवाईची मागणी ही त्यांनी केली आहे. प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहता यांच्यामध्ये यापूर्वी सुद्धा खटके उडाले आहेत. आता तर त्यांनी मेहता यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे.
आयुक्त आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका
कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला. महापालिका आयुक्तांच्या घरावर जमाव चालून गेला. त्यांना पांगवण्यासाठी मध्यरात्री पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना मध्यरात्री 2 ते 2:30 वाजता धाव घ्यावी लागली. जर पोलीस घटनास्थळी वेळेत पोहचली नसती तर महानगरापालिका आयुक्त आणि त्यांच्या कुटुंबियांचा जीवाला धोका झाला असता असा दावाही सरनाईक यांनी केला.