
मुंबई | 27 जानेवारी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आज यश आलं आहे. मनोज जरांगे त्यांच्या अंतरवली सराटी गावाहून लाखोंच्या संख्येत मुंबईला निघाले होते. त्यांच्या मोर्चाला राज्यभरातून उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. लाखो मराठा आंदोलक त्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. मनोज जरांगे आज आझाद मैदानावर पोहोचणार होते. पण त्याआधी राज्य सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळे जरांगे यांनी आपला मोर्चा वाशीमध्येच रोखला. जरांगे आता वाशीहून परत अंतरवली सराटी गावाच्या दिशेला जाणार आहेत. जरांगे यांच्या लढ्याला यश आल्याने आता त्यांचं सर्वच स्तराकडून कौतुक केलं जात आहे. त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील मनोज जरांगे यांचं अभिनंदन केलं आहे.
राज ठाकरे यांनी ट्विटरवर (एक्स) याबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांचं अभिनंदन केलं आहे. पण यावेळी त्यांनी टोला देखील लगावला आहे. “मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या”, असं राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. “आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा”, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.
श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही…
— Raj Thackeray (@RajThackeray) January 27, 2024
मनोज जरांगे यांच्या आंदोलनावेळी लाठीचार्ज झाल्यानंतर राज्यातील दिग्गज नेत्यांनी अंतरवली सराटी गावात जावून त्यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहित पवार, राज्याचे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, आमदार बच्चू कडू, मंत्री संदीपान भुमरे यांनी जरांगे यांची भेट घेतली होती. खासदार उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील मनोज जरांगे यांची अंतरवली सराटी गावात जावून भेट घेतली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील अंतरवली सराटी गवात जावून मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता.