सत्ताबदल, हिंदुत्व, राज्यपाल आणि रामदेव बाबा… राज ठाकरे यांची तोफ उद्या धडाडणार

| Updated on: Nov 26, 2022 | 4:44 PM

सकाळापासूनच मनसेचे कार्यकर्ते या मेळाव्याची जय्यत तयारी करताना दिसत आहेत. मनसेचे नेतेही या ठिकाणी येऊन कार्यक्रमाची पाहणी करत आहेत.

सत्ताबदल, हिंदुत्व, राज्यपाल आणि रामदेव बाबा... राज ठाकरे यांची तोफ उद्या धडाडणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज बुलढाण्यात सभा होत आहे. सत्तांतरानंतरची त्यांची विदर्भातील ही पहिलीच सभा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे उद्या रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या गोरेगावात सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे राज्यातील सत्ताबदल, हिंदुत्व, राज्यपाल आणि रामदेव बाबांपर्यंतच्या विषयांना हात घालणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गटाध्यक्षांचा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे ते नेस्को सेंटरपर्यंत मनसेचे झेंडे, पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात आले आहेत. नेस्को सेंटरचा परिसर आजपासूनच भगवामय झाला आहे.

हे सुद्धा वाचा

सकाळापासूनच मनसेचे कार्यकर्ते या मेळाव्याची जय्यत तयारी करताना दिसत आहेत. मनसेचे नेतेही या ठिकाणी येऊन कार्यक्रमाची पाहणी करत आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आमची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या मेळाव्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. राज ठाकरे काय बोलणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. सत्ताबदल, राज्यपाल, बाबा रामदेव आणि हिंदुत्व या मुद्द्यांवर राज ठाकरे बोलणार आहेत, अशी माहिती मनसे नेते शिरीष सावंत यांनी दिली.

मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी लक्षात घेऊन या मेळाव्याचे खास आयोजन करण्यात आले आहे. बघूया उद्या राज साहेब काय बोलतात. सगळे उद्याची वाट पाहत आहेत, असंही सावंत यांनी सांगितलं.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप तसेच मनसे आणि शिंदे गटाच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे राज ठाकरे त्यावरही भाष्य करण्याची शक्यता आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वाढत्या जवळकीवरही राज ठाकरे भाष्य करतात का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.