
सध्या राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे सर्व पक्ष महापालिका निवडणुकांच्या तयारीसाठी लागले आहेत. त्यातच आता मनसेच्या कामगार सेनेतील एका नेत्याला अटक करण्यात आली आहे. सुजय ठोंबरे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुजय ठोंबरे हा मनसे कामगार सेनेच्या चिटणीस पदावर सक्रीय आहे. त्याला खंडणी आणि अपहरणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
मनसे कामगार सेनेचे चिटणीस सुजय ठोंबरेला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. मुंबईतील आझाद मैदानात पोलिसांनी सुजय ठोंबरेला अटक केली आहे. त्याला १० लाखांची खंडणी आणि अपहरणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. यावेळी त्याने अपहरणासाठी वापरलेली थार कंपनीची गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुजय ठोंबरे आणि अन्य 4 जणांनी मिळून पांडुरंग मोरे नावाच्या एका कंपनीच्या मालकाचे अपहरण करत त्याच्याकडे खंडणी मागितल्या आरोप करण्यात आला आहे. पांडुरंग मोरे यांना शिवीगाळ करण्यात आली. तसेच त्यांना धमकी देत मनसे दादर कार्यालयात घेऊन जातोय, असे सांगण्यात आले. यावेळी तडजोडीसाठी 10 लाख द्या, अशी मागणी करण्यात आली. यामुळे आता आझाद मैदान पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. सध्या याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने विविध जबाबदाऱ्या देणार असल्याचे सांगितले. “आपली पक्ष संघटना सर्व ठिकाणी आहे. पण ती मजबूत करणं जास्त गरजेचं आहे. गटाध्यक्षाच्या घरच्यांनाही वाटलं पाहिजे माझ्या मुलाची काळजी घेतात. त्याच्याशी कोण तरी बोलतंय. मी त्याला आकार दिला. मी एक गोष्ट लिहून आणली. ती अख्खी नाही. इथे सर्व बसलेले आहेत. माझ्यासकट, प्रत्येकाचं काम काय असणार, ते दर १५ दिवसाला तपासलं जाणार. जर महिना दीड महिन्यात असं जाणवलं, हा पदाधिकारी… तो कोणी का असेना… मला त्याच्यात कामचुकारपणा दिसला तर मी त्याला पदावर ठेवणार नाही”, अशा शब्दात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तंबी दिली.