
विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई : मुंबईतील सांताक्रूझ (Santacruz Best Bus) बस डेपोतील बेस्टचे (Best Bus) कर्मचारी संपावर गेले आहेत. ऐन दिवाळीत (Diwali) बेस्ट कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारल्यानं मुंबईतील बेस्ट बस प्रवाशांचे हाल झालेत. दिवाळीचा बोनस आणि पगारवाढ न दिल्यानं कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, ऐनवेळी संपावर गेल्यानं सांताक्रूझ डेपोमधून होणारी बेस्ट बसचं वेळापत्रकही कोलमडलं आहे.
सांताक्रूझ बस डेमोमधील बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी संप पुकारलाय. त्यामुळे डेपोमध्ये एकच गोंधळ उडाला. सकाळच्या वेळी सर्व कंत्राटी कामगारांनी एकत्र येत काम बंद आंदोलन केल्याचं यावेळी पाहायला मिळालं. संप पुकारलेल्या कामगारांसोबत टीव्ही 9 मराठीने बातचीत केली. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा बोलून दाखवली.
बेस्टच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, डेपोतील अधिकाऱ्यांकडे रितसर लेखी मागण्या केल्या होत्या. त्यात पगाराची प्रमुख मागणी होती. आम्हाला जेवढं वेतन ठरवून दिलं होतं, तेवढं वेतन मिळत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी यावेळी केला.
कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 18 हजार 500 रुपये करारावर कामावर घेण्यात आलं होतं. पण या कर्मचाऱ्यांच्या हातात 12 हजार 500 रुपये इतकाच पगार हातात येतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. तुटपुंज्या पगारामध्ये वाढत्या महागाई घर कसं चालवायचं, असा प्रश्न संतप्त कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलाय.
काही महिला कर्मचाऱ्यांनीही आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करुन दिली. सुट्टी पडली की पगार कापला जातो. 10 किंवा 11 हजार रुपयेच मग हातात येतात, मुंबईत एवढ्या पगारात काय होतं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
12 हजारात काहीही होत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमची मागणी ऐकावी आणि पगार वाढवून द्यावा, असं बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी म्हटलंय. लोकांच्या दिवाळीचं बेस्ट प्रशासनाला पडलंय. पण आम्हाला सण नाही का? आमची दिवाळी कोण करणार? तरिही आम्ही येतोच आहोत ना कामावर, असं म्हणत महिला कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला.