मुंबई पुन्हा हादरली… तीन मजली बांधकाम कोसळलं, 6 जणांचा मृत्यू; अनेकजण जखमी

मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असताना मोठी दुर्घटना घडली आहे. मानखुर्दमध्ये तीन माळ्याचे बांधकाम कोसळलं आहे. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई पुन्हा हादरली... तीन मजली बांधकाम कोसळलं, 6 जणांचा मृत्यू; अनेकजण जखमी
Mumbai Building Collapase
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jul 05, 2026 | 11:06 PM

मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असताना मोठी दुर्घटना घडली आहे. मानखुर्दमध्ये तीन माळ्याचे बांधकाम कोसळलं आहे. या घटनेत ढिगाऱ्याखाली अडकून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून मदतदार्य सुरू आहे. स्थानिक नगरसेवक नवनाथ बन घटनास्थळी पोहोचले असून ते घटनास्थळाची पाहणी करत आहेत.

नगरसेवक नवनाथ बन यांनी दिली महत्त्वाची माहिती

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मानखुर्द परिसरात 3 मजली बांधकाम कोसळले आहे. या बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता या घटनेत 6 जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. एकूण सहा मृतांमध्ये दोन पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. पाचजणांचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात तर एकाचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. तर या दुर्घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.

बृहन्मुंबई क्षेत्रात झाडे/फांद्या पडण्‍याच्‍या 142 घटनांची नोंद

बृहन्मुंबई क्षेत्रातील विविध भागांमध्ये मागील 24 तासांत सुमारे 150 ते 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या कालावधीत संततधार पाऊस व समुद्राला मोठी भरती असूनही मुंबईतील जनजीवन सुरळीत राहिले. विशेष म्हणजे, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये कुठेही पाणी साचल्याची घटना घडली नाही. ताशी 72 ते 75 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे बृहन्मुंबई क्षेत्रात झाडे किंवा फांद्या पडण्याच्या एकूण 142 घटनांची नोंद झाली. या संपूर्ण परिस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेसह विविध यंत्रणांचे सुमारे 10 हजार अधिकारी व कर्मचारी शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही आपापल्या कार्यक्षेत्रात (ऑन ग्राउंड) अविरतपणे कार्यरत आहेत. वरिष्ठ अधिकारीदेखील प्रत्येक घडामोडीवर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजनांचे समन्वयन करीत आहेत.

अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान खात्याने (IMD) बृहन्मुंबई क्षेत्रात आज, रविवार, दिनांक 5 जुलै 2026 रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या दरम्यान, मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. तसेच, आज दुपारी 3.22 वाजता समुद्राला 4.19 मीटर उंचीची भरती होती. या पार्श्‍वभूमीवर महानगरपालिका मुख्‍यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून महानगरपालिका आयुक्‍त श्रीमती अश्विनी भिडे यांनी सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आश्यक ते निर्देश दिले. यावेळी अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) श्री. अविनाश ढाकणे, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्‍य) श्री. शरद उघडे यांच्‍यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कुर्ला कमानी येथे गोम्‍स टाऊन इमारतीजवळील दुकानावर झाडाची फांदी पडून युनुस कुंडावाला, वय 63 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुसऱ्या एका दुर्घटनेत आरे कॉलनीत युनीट 13 हद्दीत झाड कोसळून एका 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तसेच वरळी डेअरीजवळ खान अब्‍दुल गफार खान मार्गावर तीन मजली रिकामे असणारे बांधकाम पडल्याची देखील नोंद झाली. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Follow Us