Pankaja Munde | मुंडे-महाजनांच्या लेन्समधून मोठे झाले, आता पवारांचे लेन्स वापरतात, धनंजय मुंडेंवर पंकजा मुंडेंचे शाब्दिक तीर!

| Updated on: May 18, 2022 | 2:45 PM

मुंबईतल्या कार्यक्रमातील धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील परस्पर टोमणेही सध्या राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आहेत. मुंबईपासून बीडच्या गल्ल्या-गल्ल्यांतही ते सोशल मीडियावर आवर्जून शेअर केले जात आहेत.

Pankaja Munde | मुंडे-महाजनांच्या लेन्समधून मोठे झाले, आता पवारांचे लेन्स वापरतात, धनंजय मुंडेंवर पंकजा मुंडेंचे शाब्दिक तीर!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः एखादा बडा सार्वजनिक कार्यक्रम असावा आणि तिथे सर्वच पक्षांचे नेते उपस्थित असावेत. अशा वेळी भाषणांमधून प्रत्येकजण एकमेकांची खिल्ली उडवत असतो. मग तिथे कट्टर राजकीय वैरी असलेले काका-पुतणे किंवा बाऊ बहीण… शेरेबाजी ठरलेलीच. त्यातही अस्सल मराठवाडी भाषेत टोमणे मारणारे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) असतील तर राजकीय टीका-टिप्पणींना आणखीच रंगत येते. मुंबईतही असाच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रभादेवी येथील डॉ. तात्याराव लहाने (Tatyarao Lahane) यांच्या रघुनाथ नेत्रालयाचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, अमित देशमुख, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांवर सोडलेले शाब्दिक तीर मुंबईपासून बीडच्या गल्ल्यांपर्यंत चर्चेत आहेत.

पंकजा मुंडेंची लेन्स’ वरून शेरेबाजी

मुंबईत नेत्रालयाच्या उद्घाटनप्रसंगाचं औचित्य साधून पंकजा मुंडे यांनी ‘लेन्स’ शब्दावरून चांगलीच टोलेबाजी करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या, ‘ ज्या व्यक्तीच्या अनुभवाच्या राजकीय दृष्टीच्या लेन्सेस चांगल्या आहेत.. असे माननीय शरद पवार, ज्यांच्या लेन्सेस सर्वांना सूट करतील, जे सोबर, प्रेमळ वागतात, असे बाळासाहेब थोरात.. एक नवीन चेहरा, ज्यांच्याकडून इतरांना दृष्टी मिळण्याची अपेक्षा आहे. ज्यांच्या लेन्सेसकडे युवक पहात आहेत असे आदित्य ठाकरे… आमचे शेजारी .. विलासराव देशमुख आणि मुंडे यांच्यातील मैत्रीची परंपरा असलेल.. अमित देखमुख… मुंडे-महाजनांच्या लेन्सेसमधून स्वतःला मोठं करत पवार साहेबांच्या लेन्सेसमधून बघणारे… पवार साहेबांच्या लेन्समधून बघण्याचं भाग्य खूप कमी लोकांना लाभलंय… असे धनंजय मुंडे…माझ्या लेन्समधून बघत, काम करणाऱ्या पण खूप मेरीट असणाऱ्या भगिनी खा. प्रीतम मुंडे यांना मी अभिवादन करते.
पंकजा मुंडे यांनी अशा प्रकारे उत्तम कोट्या करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

हे सुद्धा वाचा

धनंजय मुंडेंची ‘व्यवहाराची भाषा’

पंकजा मुंडे यांनाही व्यासपीठावरून टोमणा मारण्याची संधी धनंजय मुंडे यांनी सोडली नाही. तात्याराव लहाने यांच्या सामाजिक कार्याला सलाम करताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘ पुढच्या येणाऱया दहा पिढ्यांनाही तात्याराव लहानेंचा अभिमान राहील. हे खरोखरच आमच्यासमोरचं आव्हान आहे. मी सांगेन की, अनेक जणांना दृष्टी देताना डॉ. साहेब आपण पावणे दोन लाख शस्त्रक्रिया केल्यात, मोफत केल्यात. त्यांच्या टीमनेही पावणे पाच लाख शस्त्रक्रिया मोफत केल्या. आता प्रभादेवीसारख्या दोन हजार स्र्वेअवर फूट रुग्णालयातही मोफतच करणार असाल तर पुढच्या पिढीसाठीही थोडं राखून ठेवा. थोडाफार व्यवहार पहावा, अशी मी विनंती करतो. मला कधीही व्यवहार कळला नाही. हे बाकिच्यांना माहिती नसला तरी माझ्या बहिणीला माहिती आहे… असा टोमणा धनंजय मुंडे यांनी मारला.

बंधू-भगिनीचे शाब्दित तीर चर्चेत

बीडमधील कट्टर राजकीय शत्रू असलेले धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे कोणत्याही कार्यक्रमात एकमेकांवर टीका-टिप्पणी करण्याची संधी सोडत नाहीत. त्यातच व्यासपीठावर एकत्र असताना त्यांनी थेट केलेल्या टीका अनेकदा मनोरंजन करणाऱ्या ठरतात. मुंबईतल्या या कार्यक्रमातील त्यांचे हे परस्पर टोमणेही सध्या राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आहे. मुंबईपासून बीडच्या गल्ल्या-गल्ल्यांतही ते सोशल मीडियावर आवर्जून शेअर केले जात आहेत.