Mumbai Light Issue : राज्याच्या गाडा हाकणाऱ्या मंत्र्यांच्या बंगल्यातील बत्ती गूल! तासभर वीज पुरवठा खंडित, कार्यकर्त्यांचा घामटा निघाला

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत, ते ही राज्याचा गाडा ज्या ठिकाणाहून हाकला जातो त्या मंत्रालयाला आणि मंत्र्यांच्या बंगल्यातच बत्ती गूल झाल्याचं पाहायला मिळालं.

Mumbai Light Issue : राज्याच्या गाडा हाकणाऱ्या मंत्र्यांच्या बंगल्यातील बत्ती गूल! तासभर वीज पुरवठा खंडित, कार्यकर्त्यांचा घामटा निघाला
मुंबईत मंत्र्यांच्या बंगल्यातील वीज पुरवठा तासभर खंडीत
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 17, 2022 | 8:00 PM

मुंबई : राज्यात उन्हाचा पारा वाढतोय. त्यातच राज्यावर लोडशेडिंगचंही (Load shedding) संकट आहे. ग्रामीण भाग या दोन्ही समस्यांशी लढतोय. मात्र, शहरी भागातील नागरिकांना मोठ्या उद्योग-व्यवसायांमुळे लाईट जाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागत नाही. मात्र, आज राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai), ते ही राज्याचा गाडा ज्या ठिकाणाहून हाकला जातो त्या मंत्रालयाला आणि मंत्र्यांच्या बंगल्यातच (Ministers bungalow) बत्ती गूल झाल्याचं पाहायला मिळालं. मंत्र्यांच्या बंगल्यात तासाभरापासून लाईटच नसल्यानं मंत्रिमहोदय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय.

मंत्रालयासमोर अनेक मंत्र्यांचे बंगले आहेत. या बंगल्यात आज संध्याकाळी अचानकपणे वीज पुठवठा खंडीत झाला. साधारण तासाभरापासून मंत्र्यांच्या बंगल्यात वीज नाही. त्यामुळे विविध कामासाठी आलेल्या नागरिकांनाही त्याचा फटका बसला आहे. महत्वाची बाब म्हणजे आज सकाळीही मंत्र्यांच्या बंगल्यातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह अजून काही मंत्र्यांच्या बंगल्याचा समावेश आहे.

हसन मुश्रीफांची नितीन राऊतांकडे तक्रार, चौकशीची मागणी

मंत्र्यांच्याच बंगल्याची बत्ती गूल झाल्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं. ऊर्जा खात्याच्या कारभारावर दबक्या आवाजात नाराजी व्यक्त केली जात होती. तसंच वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना सातत्याने संपर्क केला जात होता, मात्र तिथूनही उडवाउडवीची उत्तरं मिळत होती. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, मंत्र्यांच्या बंगल्याचा वीज पुरवठा खंडीत होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलून चौकशी करण्याची मागणी हसन मुश्रीफ यांनी केलीय.

सप्लाय लाईन ट्रीप झाल्यामुळे बत्ती गूल

मिळालेल्या माहितीनुसार मंत्र्यांच्या बंगल्यांना वीज पुरवठा करणारी सप्लाय लाईन ट्रिप झाल्याची माहिती मिळतेय. त्यानंतर वीज कर्मचाऱ्यांनी तातडीने काम हाती घेत वीज पुरवठा सुरळीत केला. मात्र, तरीही साधारण तासभर मंत्र्यांच्या बंगल्यांचा वीज पुरवठा खंडीत होता.