Ganesh Visarjan: निरोप देण्याची वेळ जवळ… साकीनाक्याचा महाकाय महाराजा पवई तलाव परिसरात,समोर भल्यामोठ्या बाप्पांची रांग, जेव्हीएलआर रोडवर ट्रॅफिक जॅम
Ganesh Visarjan Powai Lake: मुंबईत लाल बागचा राजासह इतर अनेक मोठ्या मंडळांचे बाप्पा विसर्जनाच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. पण समुद्रकिनाऱ्यावर आणि तलाव, धरणाच्या काठी एकच गर्दी झाल्याने विसर्जनाला उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पवई तलाव परिसरातही असेच चित्र आहे.

काल अनंत चतुदर्शीला राज्यात अनेक भक्तांनी गणपतीरायाला निरोप दिला. पण मुंबईतील आणि पुण्यातील काही मानाचे गणपतींचं अद्याप विसर्जन झालेले नाही. गिरगाव चौपाटीसह इतर समुद्र किनाऱ्यावर गर्दी उसळली आहे. मुंबईत शुक्रवारी सकाळी सार्वजनिक गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. पण आता 24 तास उलटूनही लालबागचा राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीचे विसर्जन झालेले नाही. तर दुसरीकडे मुंबई उपनगरातील पवई तलाव परिसरातही एकाच वेळी भल्या मोठ्या बाप्पांची गर्दी झाल्याने विसर्जनाला उशीर होण्याची शक्यता आहे. तर अनेक मंडळांचे कार्यकर्ते रस्त्यावर आल्याने जेव्हीएलआर रोडवर वाहतूक कोंडी झाली आहे.
बाप्पाचे विसर्जन लांबणार?
पवई तलाव परिसरात अजूनही अनेक गणेश मंडळं हे त्यांच्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी ताटकाळले आहेत. मुंबईतील सर्वात उंच गणेशमूर्तींपैकी एक साकीनाक्याच्या महाराजाचाही समावेश आहे. साकीनाक्याचा महाराजाची मूर्ती जवळपास 45 फूट उंच आहे. पवई तलाव परिसरात मेट्रो पुलाच्या जवळ साकीनाक्याचा महाराज उभा आहे. तर याच परिसरात 50 हून अधिक भल्यामोठ्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी थांबलेल्या आहेत. अनेक क्रिएटर्स आणि फोटोग्राफर हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सरसावलेले दिसले. या गर्दीमुळे बाप्पाचे विसर्जन लांबणीवर पडते की काय? अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. तर कार्यकर्ते आणि भाविकांच्या गर्दीमुळे रस्ते फुलून गेले आहे. जेव्हीएलआर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे.
३८३ हून अधिक कृत्रिम तलाव
गणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ३८३ हून अधिक कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहे. गिरगाव चौपाटीसह जुहू चौपाटी, पवई तलाव, वरळी, दादर समुद्र किनारा अशा ६७ नैसर्गिक विसर्जन ठिकाणी तयारी पूर्ण झाली आहे. ब्रुहन्मुंबई महानगर पालिकेकडून वृक्षसंवर्धनासाठी ‘एक झाड, एक गणपती’ उपक्रम राबवण्यात आला आहे. विसर्जन स्थळांवर महानगरपालिकेचे तब्बल २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. १ हजार १९४ स्टील प्लेट, २३ जर्मन तराफा, ३४ क्रेन, ८५ रुग्णवाहिकांसह १० मोटरबोट सज्ज आहेत. ४९८ निर्माल्य कलश, ३२६ निर्माल्य डंपर, २६१ स्वागत कक्ष, २२८ नियंत्रण कक्ष आणि ७५ निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. गणेशमूर्ती कृत्रिम तलावांतच विसर्जित करण्याचे महानगरपालिकेने आवाहन केले आहे.