
सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात भयानक युद्ध सुरु आहे. हे युद्ध सुरु होऊन १० दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटून गेले आहेत. आता याचा परिणाम जगभरात होताना दिसत आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता मुंबईच्या आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीवर झाला आहे. मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरचा (LPG) प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील ८० टक्के हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात सातत्याने व्यत्यय येत आहे. यामुळे अनेक तेल कंपन्यांनी १९ किलो आणि ५ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा रोखला आहे. सध्या केवळ २० टक्के सिलेंडर उपलब्ध असून या पुरवठ्यात ८० टक्क्यांची घट झाली आहे. मुंबईतील सर्वात मोठ्या HPCL कंपनीबाहेर सिलेंडरसाठी शेकडो ट्रकच्या रांगा लागल्या आहेत. या टंचाईचा फायदा घेत काळ्या बाजारात सिलेंडर दुप्पट ते तिप्पट दराने विकले जात आहेत. यामुळे अधिकृत दरातही ११५ रुपयांची वाढ झाली आहे.
गॅस टंचाईचा सर्वाधिक फटका दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘मनीज् कॅफे’ला बसला आहे. दादर आणि माटुंगा परिसरातील ५ ते ६ कॅफेमध्ये आता गॅसऐवजी लाकूड आणि कोळशाचा वापर करून चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे. या ब्रँडच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी वेळ आल्याचे बोललं जात आहे, अशी प्रतिक्रिया तेथील कामगारांनी दिली.
कांदिवली, पोईसर आणि मुंबईतील इतर झोपडपट्टी परिसरात जिथे गॅस पाईपलाईन नाही, तिथे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. पोहे आणि चहाच्या टपऱ्या चालवणाऱ्या छोट्या व्यावसायिकांकडे शेवटचा सिलेंडर शिल्लक आहे. त्यामुळे हा सिलेंडर संपल्यावर स्टॉल बंद करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही.
तर दुसरीकडे मुंबईतील कांदिवली पोईसर भागात गॅस सिलेंडरसाठी लोकांची मोठी गर्दी झाली आहे. पोईसर हा एक मोठा झोपडपट्टी भाग आहे आणि येथे गॅस पाईपलाइन नाही. त्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांना गॅस सिलेंडर न मिळाल्याने सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. लोक गॅस सिलेंडर घेऊन सकाळी ५ वाजल्यापासून रांगेत उभे आहेत. आजही लोकांना गॅस सिलेंडर मिळतील की नाही याची कल्पना नाही. मुले, वृद्ध आणि महिलांसह सर्व लोक गॅस सिलेंडरसाठी वणवण करताना दिसत आहे.
दरम्यान केवळ एलपीजीच नव्हे, तर सीएनजी पुरवठ्यालाही फटका बसला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसई हद्दीतील सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दिवसाला ५ ते ६ गाड्यांची आवश्यकता असताना केवळ ३ ते ४ गाड्या उपलब्ध होत असल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यासोबतच औद्योगिक वसाहती आणि महामार्गावरील वाहतुकीवर सीएनजीचा मोठा परिणाम झाला आहे.