दिल्लीत इस्राईलच्या दुतावासावर हल्ल्यानंतर मुंबईतही हाय अलर्ट, स्वतः विश्वास नांगरे पाटील मैदानात

| Updated on: Feb 02, 2021 | 6:50 PM

राजधानी दिल्लीत इस्राईलच्या दुतावासावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.

दिल्लीत इस्राईलच्या दुतावासावर हल्ल्यानंतर मुंबईतही हाय अलर्ट, स्वतः विश्वास नांगरे पाटील मैदानात
Follow us on

मुंबई : राजधानी दिल्लीत इस्राईलच्या दुतावासावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळेच मुंबईचे पोलीस आयुक्त (कायदा सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील स्वतः मैदानात उतरलेत. त्यांनी आज (2 फेब्रुवारी) मुंबईतील इस्राईलच्या दुतावासाला भेट देत येथील सुरक्षेचा आढावा घेतला. मुंबईत लोवर परेल, करी रोड भागातील मॅरेथॉन फ्युचरेक्स या बहुमजली इमारतीत हे दुतावास आहे. याच पार्श्वभूमीवर विश्वास नांगरे पाटील यांनी या इमारतीसह परिसराची स्वतः पाहणी केली (Mumbai Joint CP Vishwas Nangare Patil visit Israel Embassy in Mumbai amid Delhi Attack).

डिसीपी (जोन 3) परमजीत दहिया देखील मुंबईतील इस्राईल दुतावासाच्या ठिकाणी पोहचलेत. या ठिकाणची पाहणी करुन सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलीय. दिल्लीजवळ इस्राईल एम्बसीवर हल्ल्याची घटना घडलीय. त्यानंतर मुंबईतील इस्राईल हाऊस आणि चाबाड हाउसच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.

दरम्यान, दिल्लीत इस्राईलच्या दुतावासाजवळ शुक्रवारी (29 जानेवारी) एक आयईडी स्फोट झाला. सायंकाळी 5 वाजता झालेल्या या स्फोटामुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फुटल्या. या कमी तीव्रतेच्या स्फोटात कुणीही जखमी झालेलं नाही. बॉम्ब आणि घटनास्थळाची प्राथमिक फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. यात PETN प्रकारची स्फोटक वापरण्यात आल्याचं सुरक्षा दलातील सूत्रांनी सांगितलं. PETN ही लष्कराकडून वापरली जाणारी स्फोटकं आहेत. ही स्फोटकं सहज उपलब्ध होत नाहीत. यापूर्वी अल कायदा सारख्या संघटनांनी बॉम्ब बनवण्यासाठी PETN चा वापर केला होता.

तपास संस्थांना घटनास्थळावरुन “Hi-Watt” 9 वोल्ट बॅटरीचे अवशेष सापडले. याआधी इंडियन मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबाने बॉम्ब बनवण्यासाठी अशा प्रकारच्या बॅटरीचा वापर केला होता, असंही सूत्रांनी सांगितले. इंडियन मुजाहिद्दीनचे दहशतवादी बॉम्ब बनवण्यासाठी सहजतेने उपलब्ध होणाऱ्या अमोनियम नायट्रेटचा वापर करायचे.

डॉ. अब्दुल कलाम मार्गावर इस्रायली दूतावासाचे कार्यालय आहे. इथे एका मोठ्या फुलदाणीमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजल्यानंतर बॉम्बस्फोट झाला. तिथे पार्किंग केलेल्या काही गाड्यांच्या काचा फुटल्या. त्यानंतर काही तासांनी पॅरिसमध्ये इस्रायली दूतावासाजवळ प्लांट केलेला बॉम्ब सापडला. त्यामुळे दिल्लीतील ही घटना आंतरराष्ट्रीय कटाचा एक भाग असू शकते, त्या अंगाने तपास सुरु आहे.

हेही वाचा :

संडे स्पेशल- दुसऱ्या देशात घुसून ‘मोसाद’ काम कशी फत्ते करते?

‘आमच्या अण्वस्त्र वैज्ञानिकाच्या हत्येमागे इस्त्राईलचा हात’, ‘मोसाद’वरील इराणच्या आरोपाने खळबळ

इस्त्रायलकडून भारत 300 कोटींचे 100 स्पाईस बॉम्ब खरेदी करणार

व्हिडीओ पाहा :

Mumbai Joint CP Vishwas Nangare Patil visit Israel Embassy in Mumbai amid Delhi Attack