Central Railway : ऐन सकाळी मुंबई लोकल रखडली, मध्य रेल्वे विस्कळीत, सद्यस्थिती काय?

मुंबईच्या मध्य रेल्वेवर आज सकाळी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मार्गावरील लोकल गाड्या १० ते १२ मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Central Railway : ऐन सकाळी मुंबई लोकल रखडली, मध्य रेल्वे विस्कळीत, सद्यस्थिती काय?
| Updated on: Sep 09, 2025 | 8:06 AM

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेली मुंबई लोकल पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. मुंबई लोकलच्या मध्य रेल्वेवरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे उशिराने धावत आहे. कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाणाऱ्या लोकल १० ते १२ मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. तसेच लोकल विस्कळीत झाल्याने कल्याण स्थानकावर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत आणि कसारा येथून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाड्या देखील उशिराने धावत आहेत. यामुळे कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. सकाळी कामाच्या वेळी आधीच लोकलमध्ये प्रचंड गर्दी होते. त्यामुळे आधीच लोकलच्या डब्यात शिरणे कठीण होते, त्यातच आज गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडली आहे. यामुळे अनेक प्रवासी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करत आहेत.

चाकरमान्यांना मोठा मनस्ताप

मध्य रेल्वेच्या तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र हा बिघाड दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पण या बिघाडामुळे हजारो चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वेवर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ऐन सकाळी ज्यांना वेळेवर कार्यालयात पोहोचायचे आहे, त्यांना याचा मोठा फटका बसला आहे. यामुळे अनेक प्रवासी पर्यायी मार्गांचा विचार करत आहे. यामुळे रस्त्यांवरही वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने

दरम्यान मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा अशा घटना वारंवार घडत आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी दिसून येत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा किंवा त्याबद्दल उपाययोजना कराव्यात, जेणेकरून आमच्या रोजच्या प्रवासातील अडथळे दूर होतील, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. मात्र या मागणीवर काही उपाययोजना केल्या जाणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच आता सध्या मध्य रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. याबद्दल रेल्वे प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त केली जात असून, लवकरच सेवा पूर्ववत केली जाईल असे सांगण्यात येत आहे.