मुंबईची लाईफलाईनच बनली ‘डेथलाईन’, गेल्या 8 वर्षातील मृतांचा आकडा पाहून थरकाप उडेल

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये गेल्या आठ वर्षात ८२७३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, ही धक्कादायक आकडेवारी मध्य रेल्वेने उच्च न्यायालयात सादर केली आहे. २०२५ च्या पहिल्या पाच महिन्यांतच ४४३ मृत्यू झाले आहेत. ही स्थिती चिंताजनक असून, रेल्वे सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

मुंबईची लाईफलाईनच बनली डेथलाईन, गेल्या 8 वर्षातील मृतांचा आकडा पाहून थरकाप उडेल
मुंबई लोकल ट्रेन
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 15, 2025 | 9:45 AM

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेली लोकल आता मृत्यूचा सापळा बनली आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणे म्हणजे दररोज मृत्यूशी खेळण्यासारखे झाले आहे, हेच मध्य रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयाला सादर केलेल्या धक्कादायक आकडेवारीतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. गेल्या 8 वर्षात तब्बल 8273 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे २०२५ च्या पहिल्या केवळ पाच महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते मे अखेरपर्यंत ४४३ मुंबईकरांनी रेल्वे रुळ ओलांडताना आणि धावत्या लोकल ट्रेनमधून पडून आपला जीव गमावला आहे. या आकडेवारीमुळे मुंबईचा लोकल प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा ठरत आहे.

मध्य रेल्वेकडून आकडेवारी सादर

काही महिन्यांपूर्वी मुंब्रा येथे घडलेल्या एका भीषण दुर्घटनेने संपूर्ण मुंबई शहर हादरले होते. या घटनेत, दोन लोकल ट्रेनमधून एकाच वेळी ८ प्रवासी खाली पडले, ज्यात ५ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची तीव्रता इतकी होती की, बॉम्बे उच्च न्यायालयाने तात्काळ या अपघाताची दखल घेत मध्य रेल्वेकडून गेल्या काही वर्षांतील अशा अपघातांचा सविस्तर अहवाल मागवला होता. न्यायालयाच्या याच आदेशाचे पालन करत मध्य रेल्वेने हे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

अपघातांची तीन प्रमुख कारणे काय?

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, अधिवक्ता अनामिका मल्होत्रा यांच्यामार्फत मध्य रेल्वेने न्यायालयात एक सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात रेल्वे अपघातांची आकडेवारी आणि विविध मुख्य कारणे स्पष्ट करण्यात आली आहेत. रेल्वे ट्रॅकवर होणारे सर्रास अतिक्रमण, ट्रॅक ओलांडताना ट्रेनखाली येणे, धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकले जाणे, तोल जाऊन खाली पडणे यामुळे या मृत्यूंचा आकडा मात्र दरवर्षी वाढत जात आहे. मध्य रेल्वेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील रेल्वे अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ही आकडेवारी मुंबईतील रेल्वे प्रवासातील धोक्याचे गंभीर चित्र दर्शवते.

मुंबई लोकल अपघाताची धक्कादायक आकडेवारी

  • 2018 : या वर्षात ट्रॅक ओलांडताना तब्बल 1022 जणांचा मृत्यू झाला, तर धावत्या ट्रेनमधून पडून 482 प्रवाशांनी जीव गमावला.
  • 2019 : ट्रॅक ओलांडताना 920 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 426 मृत्यूची नोंद झाली.
  • 2020 : कोरोना महामारीमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे प्रवासावर निर्बंध आले होते, त्यामुळे अपघातांची संख्या काहीशी कमी दिसली. ट्रॅक ओलांडताना 471 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 134 मृत्यू झाले.
  • 2021 : निर्बंध शिथिल होताच अपघातांची संख्या पुन्हा वाढली. ट्रॅक ओलांडताना 748 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 189 मृत्यूची नोंद झाली.
  • 2022 : हे वर्षही अपघातांच्या दृष्टीने चिंताजनक ठरले. ट्रॅक ओलांडताना 654 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 510 मृत्यू झाले. धावत्या ट्रेनमधून पडून झालेल्या मृत्यूंची संख्या लक्षणीयरित्या वाढली.
  • 2023 : ट्रॅक ओलांडताना 782 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 431 मृत्यू झाले.
  • 2024 : ट्रॅक ओलांडताना 674 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 387 मृत्यू झाले.
  • 2025 (मे पर्यंत): या वर्षाच्या सुरुवातीचे केवळ पाच महिनेही मृत्यूच्या तांडवाचे साक्षीदार ठरले आहेत. ट्रॅक ओलांडताना 293 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 150 मृत्यू झाले आहेत.

दरम्यान सध्या मुंबई लोकलचे अपघात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी घेणे, रेल्वेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आणि धोकादायक प्रवास टाळणे किती महत्त्वाचे आहे, हेच या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. रेल्वे प्रशासनावरही सुरक्षित प्रवासासाठी ठोस उपाययोजना करण्याची मोठी जबाबदारी आहे. मुंबईकरांना सुरक्षित प्रवासाची हमी कधी मिळणार, हा प्रश्न अजूनही उपस्थित केला जात आहे.