मुंबईच्या महापौरांना कोरोना, लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन, किशोरी पेडणेकर यांचं ट्वीट

| Updated on: Sep 10, 2020 | 1:31 PM

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: महापौर पेडणेकर यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली.( Kishori Pednekar corona )

मुंबईच्या महापौरांना कोरोना, लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन, किशोरी पेडणेकर यांचं ट्वीट
Follow us on

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: महापौर पेडणेकर यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घ्यावं असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं. (Mumbai Mayor Kishori Pednekar tested corona positive)

“मी कोविड अँटीजन चाचणी करुन घेतली. ती सकारात्मक आली, कोणतंही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरन होत आहे. माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी. माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली. आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन”, असं ट्वीट किशोरी पेडणेकर यांनी केलं.

किशोरी पेडणेकर या लॉकडाऊनपासून अनेक उपाययोजना करताना दिसत आहेत. स्वत: रस्त्यावर उतरुन त्या कोरोना स्थितीचा आढावा घेत आहेत. अनेक रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष भेटी, कोव्हिड सेंटरमध्ये जाऊन पाहणी, गणवेश परिधान करुन नर्सना प्रोत्साहन, अशा विविध रुपात किशोरी पेडणेकर पाहायला मिळाल्या.

यापूर्वीही किशोरी पेडणेकर यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. किशोरी पेडणेकर या ग्राऊंडवर असल्याने, त्यांचा लोकांशी संपर्क येत असतो. इतके दिवस कोरोनाचा मुकाबला केल्यानंतर, आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

किशोरी पेडणेकर यांना जून महिन्यात सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ताप आल्याने तपासणीसाठी त्या रुग्णालयात गेल्या असताना उपचारासाठी त्यांना अ‍ॅडमिट करण्यात आले. मात्र काही दिवसातच प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला.

किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊन आणि कोरोना काळात मुंबईतील अनेक रुग्णालये आणि हॉटस्पॉट्सना भेटी दिल्या. कोरोना काळात त्यांनी ग्राऊंडवर उतरुन आरोग्य कर्मचारी आणि कोव्हिड योद्ध्यांचं मनोबल वाढवण्याचं काम केलं.

पेडणेकर यांनी केईएम, नायर, शताब्दी यासारख्या रुग्णालयांना भेटी दिल्या होत्या. इतकंच नाही तर किशोरी पेडणेकर यांनी स्वत: नर्सचा गणवेष परिधान करुन नायर रुग्णालयात जात तिथल्या कर्मचाऱ्यांचा हुरुपही वाढवला होता.

भावाचा कोरोनामुळे मृत्यू

महापौर किशोरी पेडणकेर यांचे मोठे भाऊ सुनील कदम यांचा कोरोनामुळे 1 ऑगस्ट रोजी सकाळी मृत्यू झाला होता. ते 59 वर्षांचे होते.  सात दिवसांपासून मुंबईच्या नायर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, 1 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सुनील यांच्या आठवणीत किशोरी पेडणेकर यांनी ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली होती.

(Mumbai Mayor Kishori Pednekar tested corona positive)

संबंधित बातम्या  

घेत होता भरारी उंच नभात, पण कुठेतरी आभाळ फाटलं, महापौर पेडणेकरांच्या भावाचं कोरोनाने निधन

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सैफी रुग्णालयात, सकाळपासून ताप आल्याने तपासणी

मुंबईच्या महापौर झाल्या कोविड योद्धा, किशोरी पेडणेकर पुन्हा नर्सच्या भूमिकेत