पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती, मुंबईतील दूध पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता

| Updated on: Jul 24, 2021 | 9:03 AM

कोल्हापूर येथील गोकुळ दूध उत्पादक संघ आणि गुजरातमधील अमूलकडून साधारण 22 लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो. शिवाय सांगली-सातारा येथून इतरही काही दूध संघांकडून मुंबईला दूध पुरवठा होतो.

पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती, मुंबईतील दूध पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

मुंबई : मुंबईतील दूध पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे आवक खंडित होण्याची भीती आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण येथे आलेल्या पुरामुळे पश्चिम महाराष्ट्रातील दूध संकलन आणि वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे. दूध विक्रेत्यांकडे एका दिवसाचा दुधाचा साठा असला तरी पूरस्थिती, पाऊस कायम राहिल्यास आणि वाहतूक पूर्वपदावर न आल्यास दूधाचा पुरवठा खंडित होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

गोकुळच्या दूध संकलनात काहीशी घट

कोल्हापूर येथील गोकुळ दूध उत्पादक संघ आणि गुजरातमधील अमूलकडून साधारण 22 लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो. शिवाय सांगली-सातारा येथून इतरही काही दूध संघांकडून मुंबईला दूध पुरवठा होतो. सध्या कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात पूरस्थिती गंभीर असून अनेक महामार्ग, रस्ते बंद आहेत. या भागांतील गोठ्यांवरही पूराचा परिणाम झाला आहे. त्यामुळे गोकुळच्या दूध संकलनात काहीशी घट झाली आहे.

मराठवाड्यातून येणारे दूध अपुरे

मराठवाड्यातून मिळणारे आणि महानंदाचे दूध मुंबईत येते. ते मुंबई, ठाणे आणि उपनगरांची गरज पूर्ण करण्याएवढे असल्याचे दिसत नाही. कर्नाटकाला जोडणारे अनेक मार्गही सध्या बंद झाले आहेत. त्यामुळे तेथून येणाऱ्या दीड ते दोन लाख लिटर दुधाची वाहतूक कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोल्हापुरात भीषण परिस्थिती

पंचगंगा नदीची पाणी पातळी 53 फुटांवर गेल्यामुळे आंबेवाडी आणि चिखली ही दोन्ही गावं पाण्यात बुडाली आहेत. 2019 च्या महापुरातही ही गावं पाण्यात बुडाली होती. त्यामुळे सावधगिरी म्हणून नागरिकांना घरातून बाहेर पडण्याचं आवाहन रेस्क्यू टीमकडून करण्यात येत आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पुणे-बंगळुरु महामार्गावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तसंच कोल्हापूर शहरातून महामार्गाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात झाले आहेत. नदीच्या पाणीपातळीत अशीच वाढ होत राहिली तर परिस्थिती गंभीर बनू शकते. त्यामुळे नागरिकांनी वेळीच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं जात आहे.

संबंधित बातम्या :

Sangli Flood : कोल्हापूर, सांगलीत पूरस्थिती; जलसंपदामंत्री सांगलीत दाखल, अधिकारी आणि नागरिकांच्या सातत्याने संपर्कात

Kolhapur Flood : पंचगंगेची पाणीपातळी 53 फुटांवर, आंबेवाडी, चिखली पाण्याखाली, नागरिकांना घराबाहेर पडण्याचं आवाहन

(Mumbai Milk Supply may affected as Kolhapur Sangli flooded)