कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी ‘मेगा प्लॅनिंग’; कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, प्रशिक्षणासोबतच मुंबई महापालिका आणखी काय करणार ?

| Updated on: Aug 11, 2021 | 7:35 PM

‘कोविड – 19’ या साथरोगाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक ते नियोजन व तयारी करण्यात येत आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मेगा प्लॅनिंग; कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, प्रशिक्षणासोबतच मुंबई महापालिका आणखी काय करणार ?
BMC
Follow us on

मुंबई : युरोप, अमेरिकेसह इतर काही देशांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने  तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक ते नियोजन व तयारी करणे सुरु केले आहे. भविष्यात सदर परिस्थिती उद्भवल्यास आव्हानाचा अधिक प्रभावीपणे मुकाबला करणे शक्य होईल याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका ही तयारी करत आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या नेतृत्त्वात सर्वस्तरीय कार्यवाही व नियोजन करण्यात येत आहे. (Mumbai Municipal Corporation increased contact tracing taking and taking other precautionary measures to tackle third corona wave)

यामध्ये प्रामुख्याने खाटांची उपलब्धतता वाढविणे, कोविड उपचार केंद्र व रुग्णालये इत्यादींची संख्या वाढविण्यावर विचार केला जात आहे. तसेच सर्व बाबी अधिक सुसज्ज करणे, कोविड चाचण्यांची संख्या वाढविणे, प्रतिबंधित क्षेत्रांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करणे इत्यादी बाबींचा यामध्ये समावेश आहे.

7 परिमंडळ आणि 24 विभाग कार्यालयांना निर्देश 

वरीलबाबत अधिक माहिती देताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे)  सुरेश काकाणी यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व म्हणजे 7 परिमंडळांना आणि 24 विभाग कार्यालयांना सुस्पष्ट निर्देश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. या निर्देशांबाबत महत्त्वाची मुद्देनिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे.

कोविड सेंटर्सचे निरीक्षण करुन तपशील द्या

1. कोविड उपचार केंद्र 1 व 2 बाबत (सीसीसी – 1 व 2) : कोविड बाधित रुग्णांवर यथायोग्य उपचार करण्याच्या दृष्टीने ‘कोविड – 19’ या साथरोगाच्या पहिल्या व दुसऱ्या  लाटेदरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे अनेक ठिकाणी ‘कोविड उपचार केंद्र – 1’ (COVID Care Centre – 1) आणि ‘कोविड उपचार केंद्र – 2’ (COVID Care Centre – 2) उभारण्यात आली होती. यापैकी, ‘कोविड उपचार केंद्र – 1’ मध्ये लक्षणे नसलेल्या कोविड बाधित रुग्णांवर उपचार केले जात होते. तर काही प्रमाणात लक्षणे असलेल्या (Mild Symtamatic) रुग्णांवर ‘कोविड उपचार केंद्र – 2’ मध्ये वैद्यकीय उपचार क्रमानुसार उपचार केले जातात. यानुसार पहिल्या व दुस-या लाटे दरम्यान ज्या ठिकाणी कोविड उपचार केंद्रे उभारण्यात आली होती, त्या सर्व ठिकाणांचे निरिक्षण करुन त्यांची यादी व संबंधीत तपशील अद्ययावत करण्यासह या ठिकाणी आवश्यक असणारे मनुष्यबळ व आवश्यक असणाऱ्या सेवा इत्यादी तपशिलाचीही नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोरोना चाचण्यांसाठी कीट उपलब्ध असल्याचे खातरजमा करा

2. कोविड विषयक वैद्यकीय चाचणीबाबत : आता हळूहळू व टप्प्याटप्प्याने व्यवसाय विषयक आणि अर्थकारण विषयक विविध बाबी पुन्हा सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोविड विषयक वैद्यकीय चाचण्यांची संख्या अधिकाधिक वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये ‘आरटीपीसीआर’ चाचणी (RTPCR) व ‘रॅपिड ऍण्टीजेन’ चाचणी (RAT) या दोन्ही प्रकारच्या चाचण्यांचा समावेश आहे. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सदर वैद्यकीय चाचणी सुविधा देणा-यांकडे आवश्यक तेवढ्या प्रमाणातील ‘किट’ ची उपलब्धतता असल्याची खातरजमा करण्याचे आणि संभाव्य आवश्यकता लक्षात घेऊन योग्य ते नियोजन व कार्यवाही करण्यात येत आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यात येणार

3. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग : कोविड या साथरोगाच्या प्रसारास अटकाव व्हावा, या उद्देशाने कोविड बाधित रुग्णांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जाते. या अनुषंगाने प्रत्येक बाधित रुग्णामागे 15  व्यक्तिंचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत होते. हे प्रमाण वाढवून आता प्रत्येक रुग्णामागे 20 व्यक्तिंचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येणार आहे.

4. प्रतिबंधित क्षेत्र आणि बाधित रुग्णांचा पाठपुरावा : प्रतिबंधित क्षेत्रांमधील बाधित रुग्ण आणि संशयित रुग्ण यांच्या स्तरावर अधिकाधिक प्रभावी व सातत्यपूर्ण पाठपुरावा नियमितपणे करण्याच आदेश देण्यात आले आहेत.

नियंत्रण कक्षांचा आढावा घेण्यात येत आहे

5. विभागस्तरीय नियंत्रण कक्षांचा आढावा व प्रशिक्षण : कोविड विषयक व्यवस्थापन अधिक प्रभावी व अधिक सुयोग्यप्रकारे करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये विभागस्तरीय नियंत्रण कक्ष (Ward War Room) कार्यरत आहेत. तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर या नियंत्रण कक्षांचा आढावा घेण्यात येत आहे. त्याचबरोबर संभाव्य तिस-या लाटेदरम्यान लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन या अनुषंगाने आवश्यक ते प्रशिक्षण देखील नियंत्रण कक्षांमध्ये कार्यरत असणा-यांना देण्यात येणार आहे.

स्वच्छता विषयक सेवा, खानपान सेवेबाबत आढावा 

6. जम्बो कोविड रुग्णालये व कोविड उपचार केंद्रांबाबत : बृहन्मुंबई महानगरपालिकेने अल्पावधीत कार्यान्वित केलेली जम्बो कोविड रुग्णालये आणि कोविड उपचार केंद्र इत्यादी ठिकाणी असणा-या सोयी-सुविधा, वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक असणा-या बाबींचा पुरवठा, साफसफाई व स्वच्छता विषयक सेवा, खानपान सेवा इत्यादींबाबत देखील आढावा घेण्यात येत आहे.

नागरिकांनी नियमांचे पालन प्रभावीपणे करावे

7. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे परिपूर्ण पालन : कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक असणा-या ३ नियमांचे पालन नागरिकांनी अधिकाधिक प्रभावीपणे करावे, यासाठी जनजागृतीपर कार्यवाही अधिक प्रभावी करण्यासह दंडात्मक कारवाई देखील अधिक काटेकोरपणे करण्यात येत आहे. सदर 3 नियमांमध्ये सार्वजनिक ठिकाण मुखपट्टी वापरणे, 2 व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर असणे, वारंवार साबणाने स्वच्छ हात धुणे या बाबींचा प्रामुख्याने समावेश आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

30 हजार 364 रुग्णशय्या (बेड) उपलब्ध

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयांमध्ये जुलै अखेरीस उपलब्ध आकडेवारीनुसार 30 हजार 364 रुग्णशय्या (बेड) उपलब्ध आहेत. यामध्ये 17 हजार 697 ऑक्सिजन रुग्णशय्या, 3 हजार 788 अतिदक्षता रुग्णशय्या, लहान मुलांसाठी 1 हजार 460 रुग्णशय्या, लहान मुलांसाठीच्या अतिदक्षता कक्षात 230 रुग्णशय्या आणि नवजात बालकांसाठीच्या अतिदक्षात कक्षात (NICU) 53 रुग्णशय्या उपलब्ध आहेत.

इतर बातम्या :

शाळा-कॉलेज सुरु करण्यावर अवघ्या 24 तासात ब्रेक, आज-उद्या अंतिम निर्णय अपेक्षित, टास्क फोर्सचा विरोध का?

हॉटेल्स रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, पण अटी आणि शर्थी लागू, वाचा काय आहेत नियम ?

(Mumbai Municipal Corporation increased contact tracing taking and taking other precautionary measures to tackle third corona wave)