
सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून महापालिका निवडणुकांची जोरदार तयारी केली जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्याआधीच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आला आहे. नुकतंच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एक भव्य संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणे असल्याचे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील कांदिवली पश्चिमेत उत्तर मुंबई जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एक भव्य संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्याला रिपाईच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. या मेळाव्यादरम्यान विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी रिपाई आठवले गटामध्ये प्रवेश केला. ज्यामुळे पक्षाची ताकद वाढल्याचे दिसून आले. या मेळाव्याला सीमा आठवले, माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर यांचीही उपस्थिती होती. या रिपाईच्या मेळाव्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अनेक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. त्यासोबतच त्यांनी भाजपसोबतच्या युतीची भविष्यातील दिशा स्पष्ट केली.
रामदास आठवले यांनी महायुतीचा मुंबई महापालिकेवरील ताबा निश्चित करण्यासाठी रणनीती स्पष्ट केली. मुंबईत भाजपची मोठी ताकद आहे. महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार, यात शंका नाही. मुंबई महानगरपालिका महायुतीच्या ताब्यात आली पाहिजे हा आमचा उद्देश आहे. मुंबईत भाजपचा महापौर होईल. तसेच यावेळी रिपाईला उपमहापौर पद मिळावे. उत्तर पश्चिम जिल्ह्यातील ४२ पैकी ८ जागा आणि संपूर्ण मुंबईतील एकूण २० जागा रिपाईला मिळाव्यात अशा मागण्या रामदास आठवले यांनी केल्या.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर आठवले यांनी जोरदार टीका केली. “दोन ठाकरे सोडा, तीन ठाकरे जरी एकत्र आले तरी त्यांना यावेळी यश मिळणार नाही. ते पूर्वी भाजप सोबत असल्यामुळेच शिवसेनेला सत्ता मिळत होती. पण आता महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. महाराष्ट्रात भाजप नंबर एकवर आहे. मुंबईकरांमध्ये मराठी मतांची ज्या ठिकाणी मेजॉरिटी आहे, तिथेच त्यांना जागा मिळतील. पण आमच्यासोबतही २० टक्के मतदार आहेत. मराठी लोकांचा भाजपला चांगला पाठिंबा आहे, असा दावा रामदास आठवले यांनी केला.