मुंबईत बिबट्या शिरला, मालाडमध्ये खळबळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Mumbai News : राजधानी मुंबईतील मालाड पूर्व भागात बिबट्या आढळला आहे. एका रहिवासी सोसायटीमध्ये बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबईत बिबट्या शिरला, मालाडमध्ये खळबळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
malad bibtya
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Apr 07, 2026 | 4:47 PM

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागात बिबट्याने धुमाकूळ घातल्याचे समोर आले होते. बिबट्याच्या हल्ल्यात काही नागरिकांसह अनेक पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. अशातच आता शहरी भागातही बिबट्याने शिरकाव केल्याचे समोर आहे. राजधानी मुंबईतील मालाड पूर्व भागात बिबट्या आढळला आहे. एका रहिवासी सोसायटीमध्ये बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुंबईत बिबट्याचा शिरकाव

मुंबईच्या मालाड पूर्व भागातील रहेजा हाइट्स सोसायटीमध्ये बिबट्या दिसल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटे सुमारे 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान सोसायटीच्या डी विंग परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये एक बिबट्या फिरताना दिसला. फुटेजमध्ये बिबट्या पार्किंग परिसरात फिरताना स्पष्टपणे दिसत असून, त्यामुळे रहिवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण

सोसायटीतील रहिवासी विजयकुमार एन. बोरा यांनी सांगितले की, या भागात बिबट्या दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत, त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याच्या वारंवार वावरामुळे विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेबाबत लोक चिंतित आहेत. रहिवाशांनी प्रशासन आणि वन विभागाकडे तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. तसेच कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी स्थानिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचेही समोर आले आहे.

नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आवाहन

समोर आलेल्या माहितीनुसार याआधीही या सोसायटीमध्ये बिबट्याचा वावर पहायला मिळाला होता. त्यामुळे सोसायटीतील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत रहिवाशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पहाटेच्या वेळेस बिबट्या दिसल्याने परिसरातील नागरिकांनी रात्री व पहाटे बाहेर पडताना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे मालाड परिसरात पुन्हा एकदा वन्यप्राण्यांच्या वावराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता प्रशासन आणि वनविभाग या बिबट्याचा बंदोबस्त नेमका कसा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Follow Us