डीलिमिटेशन बिलावरून काँग्रेसमध्येच फूट, आमदाराचं समर्थन; काय दिला तर्क?
कर्नाटकचे काँग्रेस आमदार कोठूर मंजुनाथ यांनी डीलिमिटेशन बिलाचे समर्थन केले असून, मतदारसंघ छोटे झाल्यास नागरिकांना चांगल्या सुविधा आणि विकास करणे सोपे जाईल असा तर्क मांडला आहे. पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विपरीत असलेल्या या भूमिकेमुळे डीलिमिटेशन बिलावरून काँग्रेसमध्येच फूट पडल्याचे समोर आले आहे.

डीलिमिटेशन बिलावरून काँग्रेसमध्येच फूट पडताना दिसत आहे. एकीकडे डीलिमिटेशन बिल कसं देशविरोधा आहे हे सांगत काँग्रेसकडून समर्थन मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या आमदारानेच डीलिमिटेशन बिलाचं समर्थन केलं आहे. त्यासाठी त्यांनी तर्कही दिला आहे. अर्थात आमदाराने बिलाला समर्थन दिलं असलं तरी त्याचा संसदेत काही फरक पडणार नाही. कारण बिलावर खासदारांना मतदान करायचं आहे. आमदारांना मतदानाचा हक्क नाही. पण पक्षाचा आमदारच जेव्हा बिलाचं समर्थन करतो तेव्हा संभ्रम निर्माण होतो आणि नेतृत्त्वाकडून बिलाच्या समर्थनासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांवर पाणी फिरू शकतं. त्यामुळेच या आमदाराने बिलाला दिलेल्या समर्थनाला महत्त्व आलं आहे. शिवाय काँग्रेसमध्ये या बिलावरून दोन मतप्रवाह असल्याचंही समोर आलं आहे.
कोठूर मंजुनाथ असं या आमदाराचं नाव आहे. मंजुनाथ हे काँग्रेसच्या तिकिटावर कर्नाटकातून निवडून आले आहेत. त्यांनी डीलिमिटेशन बिलाचा बाजू उचलून धरली आहे. विधानसभेतील मतदारांची संख्या कमी झाल्यास तिथल्या नागरिकांना चांगली सेवा देण्यास मदतच होणार आहे, असा दावा कोठूर मंजुनाथ यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले?
कोणत्याही विधानसभा मतदार संघात 1 लाख ते 1 लाख 50 हजार मतदार असायला हवेत. हा आदर्श आकडा आहे. तसेच लोकसभा मतदारसंघात 5 ते 8 लाख मतदार असले पाहिजेत. मी डीलिमिटेशन बिलाचं स्वागत करतो. जर विधानसभा क्षेत्रात 1 ते दीड लाख वोटर असतील तर आमदारांनाही मतदारांची चांगली सेवा करता येईल. मतदारसंघाचा चांगला विकास करता येईल, असं मंजुनाथ म्हणाले.
क्षमता वाढेल
भारताची लोकसंख्या इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. पण मतदारसंघ छोटा केल्यास तिथल्या नागरिकांना चांगल्या सुविधा देता येतील. आपली लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे मतदारसंघ छोटे हवेत. त्यामुळे विकास प्रकल्प राबवणं सोपं जातं आणि मतदारसंघातील समस्या सोडवण्याची क्षमता वाढू शकते, असं ते म्हणाले.
सल्लाही दिला
यावेळी त्यांनी मतदारसंघाची लोकसंख्या किती असावी याचा सल्लाही दिला. आपल्या देशातील विधानसभेची लोकसंख्या 1 लाख ते 1 लाख 50 हजार असायला हवी. लोकसभा मतदारसंघाची लोकसंख्या 5 ते 8 लाख असायला हवी. लोकसभेच्या जागांची संख्या 800 ते 900 वाढल्या पाहिजे. या विधेयकांमुळे मतदारसंघ वाढत असतील आणि मतदारांची संख्या कमी होत असेल तर मी त्याचं स्वागतच करेन, असंही त्यांनी सांगितलं.
काँग्रेसचे सर्वच नेते या विधेयकाला लोकशाही विरोधी ठरवत आहेत. या विधेयकामुळे भाजप कायमचा सत्तेत बसेल आणि हुकूमशाही येईल म्हणून सांगत आहेत. त्यासाठी विरोधी पक्षातील आपल्या सहकाऱ्यांना एकजुटीने सोबत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशावेळी आमदार मंजुनाथ यांनी वेगळाच सूर लावल्याने पक्षातच विधेयकावरून एकमत नसल्याचं समोर आलं आहे. यामुळे काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र दिसत आहे.
