2024ची लोकसभा निवडणूक बेकायदेशीर होती, गॅरंटीने सांगतो वाराणासीतही हरले; राहुल गांधींचा नवा बॉम्ब
राहुल गांधींनी 2024 च्या लोकसभा निवडणुका बेकायदेशीर ठरवत डीलिमिटेशन विधेयकावर तीव्र टीका केली आहे. हे विधेयक लोकशाहीची हत्या असून, सत्ता टिकवण्यासाठी मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे दलित आणि मागासवर्गीयांच्या जागा गोठवल्या जातील, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

केंद्र सरकारने डीलिमिटेशन बिल संसदेत मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने संसदेचं अधिवेशन बोलावलं आहे. या डीलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाने आणि डीएमकेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत मोठी फूट पडली आहे. मात्र, इंडिया आघाडीने आज एकमुखाने या विधेयकाला विरोध करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. डीलिमिटेशन बिलाच्या माध्यमातून लोकशाहीची हत्या करण्यात येत आहे, असं सांगतानाच 2024मध्ये घेतलेली लोकसभेची निवडणूक अवैध होती, असा खळबळजनक दावाही राहुल गांधी यांनी केला आहे.
महिला आरक्षण बिल आधीच मंजूर करण्यात आलं आहे. मग 850 जागा का वाढवाय्चया आहेत. हा बदल करण्यामागचं नेमकं कारण काय आहे? असा सवाल करतानाच पाहिजे त्या मतदारसंघावर पाहिजे तश्या रेघोट्या मारण्यासाठी आणि आपल्या सोयीचे मतदारसंघ बनवण्यासाठी मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात येत आहे. 850 जागा वाढवणं हा लोकशाहीचा खून आहे. भारताच्या मतदारसंघाचा नकाशा बदलण्याचं काम सुरू आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
ही त्यांचीच आयडिया
डीलिमिटेशन ही नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांची आयडिया आहे. त्यांना जेनजीचे आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे. गेल्या दहा वर्षापासून त्यांनी व्होट चोरी केली आहे. आता त्यांनी डीलिमिटेशनच्या माध्यमातून सत्ता राखण्याचा नवीन मार्ग शोधला आहे. निवडणूक चोरल्या जात आहेत हे 80 टक्के भारताला माहीत आहे. 2024ची निवडणूक अवैध होती. गॅरंटीने सांगतो ते वाराणासीतही हरलेत, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
दलितांच्या जागा गोठवणार
या डीलिमिटेशनमध्ये दलितांच्या हिताच्या गोष्ट नाहीत. दलितांसाठी जुनचं आरक्षण आहे. मात्र त्यांच्या जागा 40 वर्षासाठी गोठवल्या जाणार आहेत. म्हणजे आज जेवढ्या जागा आहेत. तेवढ्याच जागा यापुढेही राहणार आहेत. अनुसूचित जाती आणि जमातीची लोकसंख्या वाढली तरी जागा वाढवल्या जाणार नाहीत. हा दलितांवर अन्याय आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
ज्ञानेश कु्मार यांची कुंडली मांडणार
आम्ही ज्ञानेश कुमार यांची कुंडली मांडणार आहोत. ज्ञानेश कुमार यांनी कशी चोरी केली? निवडणुका जिंकवण्यासाठी कशी मदत केली? याची सर्व माहिती आम्ही देणार आहोत. थोडे दिवस थांबा. सर्व माहिती आम्ही देणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.
