
मुंबईत काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरी याचा परिणाम मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर झाला आहे. सध्या मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या १०-१५ मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. तसेच सध्या मध्य रेल्वेच्या बहुतांश स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री कुर्ला येथे मध्य रेल्वेच्या हेडवायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. सकाळी चार वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. यामुळे लोकल सात मिनिटे, तर हार्बर लाईनवरील सेवा पाच मिनिटे उशिराने धावत आहे. दादर रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. सध्या मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या १०-१५ मिनिटे उशिराने धावत आहे. यामुळे AC लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे सकाळचे रेल्वे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाणाऱ्या लोकल सेवाही विलंबाने धावत आहेत.
वसई, विरार, नालासोपारा आणि परिसरात रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. सकाळी पावसाने विश्रांती घेतली असली तरी, नालासोपारा पूर्वेकडील गाला नगरमधील सर्कलवर अजूनही पाणी साचले आहे. शाळकरी मुले, त्यांचे पालक आणि कामावर जाणारे चाकरमानी यांना याच पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.
तसेच पुण्यात सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्याने चारही धरणांमधील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा झाला आहे.
एकूण धरण साठा: ३५.८३ टक्के
नाशिक शहरात जून महिन्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तब्बल दहा वर्षांनंतर शहरात जून महिन्यात ३१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहर आणि पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने जून महिन्यातच अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरण ६५ टक्क्यांपेक्षा जास्त भरल्याने गोदावरी नदीत ६ हजार क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दारणा, कडवा, नांदूरमध्यमेश्वर धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, नांदूरमध्यमेश्वरमधून १५ हजार क्यूसेस वेगाने गोदावरी नदीत पाणी सोडले जात आहे. नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने जात असल्याने जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला असून, अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणात गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरू असून, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी मराठवाड्यातील काही भागांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.