
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. सध्या या सात तलावांमध्ये फक्त ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांवरील पाणी संकटाचे सावट अधिक गडद झाले आहे. मुंबईतील तलावांमधील पाणीपातळी कमी झाल्याने लवकरच पाणी कपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा या सात तलावातून दररोज ३८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. मुंबईतील तलावातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यातच हवामानातील बदलांमुळे पाऊस लांबणीवर पडल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे.
मुंबईकर गेल्या वर्षापासूनच १० ते २० टक्क्यांपर्यंत पाणी कपातीचा सामना करत आहेत. सध्याच्या पाणीसाठ्याची आकडेवारी पाहिल्यास अप्पर वैतरणा जलाशयात ९२ हजार ३५ दशलक्ष लिटर, मोडक सागरमध्ये ३० हजार २६० दशलक्ष लिटर, तानसामध्ये ३८ हजार ६६० दशलक्ष लिटर, मध्य वैतरणामध्ये ७५ हजार ५८५ दशलक्ष लिटर, भातसामध्ये सर्वाधिक २ लाख ३८ हजार ९५९ दशलक्ष लिटर, विहारमध्ये १२ हजार ३९० दशलक्ष लिटर आणि तुळशीमध्ये सर्वात कमी ३ हजार ५५० दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.
मुंबईतील पाणीसाठ्याची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या गंभीर परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारच्या अखत्यारीतील वैतरणा आणि भातसा या मोठ्या पाणी प्रकल्पांमधून राखीव कोट्यातील पाणीसाठा देण्याची मागणी केली आहे. महापालिकेने याबाबत मागणी करुन तीन आठवडे उलटले आहेत. तरी राज्य सरकारचा हा निर्णय प्रलंबित ठेवला आहे. त्यामुळे मुंबईतील पाणी संकट अधिक गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच राज्य सरकार यावर कधी निर्णय घेणार आणि तातडीने निर्णय घेणार का? याकडे आता मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
सध्या मुंबईतील धरणांचा पाणीसाठ ३३ टक्क्यांवर आला आहे. कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होतं आहे. यंदाचा पाऊस लांबला तर मुंबईकरांवर पाण्याचे संकट ओढवणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. पाणी पुरवठा खात्याचा राखीव पाणी वापरासाठी पाठपुरवठा करणे सुरू आहे. मुंबईच्या ७ धरणांमध्ये फक्त पाच लाख सात हजार ४४५ दशलक्ष पाणीसाठा म्हणजेच ३३ टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे लवकरच पाणी संकट ओढावणार असल्याचे दिसत आहे.