मुंबईत पावसाचा जोर ओसरला, वसई-विरार, कल्याण-डोंबिवलीत काय स्थिती? पुढील 3 तासांचा अंदाज काय?

गेल्या तीन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर मुंबईत आज पावसाचा जोर कमी झाला आहे. रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर झालेल्या विस्कळीततेमुळे नागरिकांना मोठा त्रास झाला होता. मात्र, पावसाचा जोर कमी झाल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. तरीही हवामान विभागाने पुढील काही तासांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि रेल्वे सेवा अजूनही विस्कळीत आहे.

मुंबईत पावसाचा जोर ओसरला, वसई-विरार, कल्याण-डोंबिवलीत काय स्थिती? पुढील 3 तासांचा अंदाज काय?
सध्या एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी काम करत आहे. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक घराबाहेर न पडण्याचा आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
| Updated on: Aug 20, 2025 | 8:03 AM

गेल्या तीन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर आज मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मुंबईत सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी रिमझिम पाऊस सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. काही ठिकाणी लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. पण आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असून, शहरात फक्त रिमझिम पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

मुंबईत संततधार पावसानंतर आज पावसाने थोडी विश्रांती घेतली असली, तरी हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील ३ ते ४ तासांत काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांनी पुढील काही तास आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सलग तिसऱ्या दिवशीही मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. कल्याण स्थानकावर मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाड्या अर्धा तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे. यामुळे कामावर निघालेले नोकरदार आणि प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. तीन दिवसांच्या सतत पावसानंतरही, वीरा देसाई रोडवर अजूनही पाणी साचलेले आहे. पण पाऊस थांबल्यामुळे मिठी नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे.

मिठी नदीची पाणी पातळी ओसरली

कुर्ल्यातील एलबीएस रोडवर सध्याची परिस्थिती सामान्य असली तरी पावसाचा जोर वाढल्यास स्थिती गंभीर होऊ शकते. काल मिठी नदी तुडुंब भरल्यामुळे पाणी एलबीएस रोड आणि आसपासच्या झोपडपट्ट्यांमध्ये शिरले होते. आज पाऊस थांबल्यामुळे मिठी नदीची पाणी पातळी कमी झाली आहे. ज्यामुळे क्रांतीनगर भागातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर रायता आणि कांबा गावाजवळ रस्त्यावर पाणी साचल्याने कल्याण-नगर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याची सूचना कल्याण तहसीलदारांनी दिली आहे.

मुंबई महापालिकेचे आवाहन काय?

बृहन्मुंबई क्षेत्रात मागील दोन दिवसांत अतिमुसळधार पाऊस कोसळला आहे. तसेच, बुधवार, दिनांक २० ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्रीपासून अधून मधून संततधार पाऊस सुरु आहे. सद्य परिस्थितीत मुंबईतील जनजीवन सामान्य आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेसेवेसह ‘बेस्ट’ वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर (on field) अविरतपणे आणि तत्परतेने कार्यरत आहे. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षात १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

वसई-विरारमध्ये मात्र अजूनही गंभीर स्थिती

मुंबईला पावसामुळे थोडा दिलासा मिळाला असला तरी वसई-विरारमध्ये मात्र अजूनही गंभीर स्थिती आहे. सलग चौथ्या दिवशीही पाऊस सुरू असल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. नालासोपारा, वसई आणि विरारमधील पूर्व आणि पश्चिम दोन्ही भाग पाण्याखाली गेले आहेत. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना जीवनदानी मंदिर ट्रस्टकडून जेवणाचे वाटप केले जात आहे.