
रक्ताची जशी नाती असतात, तशी काही नाती ही रक्तापलीकडची असतात. आयुष्यात या नात्यांच स्थान, महत्व सांगण्यासाठी शब्द सुद्धा कमी पडतात. अशा नात्यांमध्ये एक आपलेपणा, जिव्हाळा, प्रेम, आपुलकी असते. असच एक नातं दीनानाथ वेलिंग आणि गणेश गल्ली मंडळाचं आहे. दीनानाथ वेलिंग हे प्रसिद्ध मूर्तिकार. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, म्हणजे गणेश गल्ली गणेशोत्सवात नावारुपाला आली, त्याचं बरचस श्रेय हे दीनानाथ वेलिंग यांना जातं. मूर्तिकलेत पारंगत असलेल्या या माणसाने 1977 साली जे केलं, त्यानंतर लालबाग आणि गणेश गल्लीची देशातच नाही, तर जगात वेगळी ओळख निर्माण झाली.
ते मंडळाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं. त्यावर्षी प्रथमच दीनानाथ वेलिंग यांनी मंडळासाठी 22 फुटी गणरायाची मुर्ती साकारली. भारतात प्रथमच इतक्या भव्य स्वरुपात गणरायाची मोठी मुर्ती बनवण्यात आलेली. यानंतर जो घडला तो इतिहास. यापुढे दीनानाथ वेलिंग आणि लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्लीच एक वेगळं नातं तयार झालं. 1977 ते 1989 अशी 12 वर्ष हा प्रवास सुरु होता.
हे ऐकताना डोळे पाणावतील
मंडळाचे उपाध्यक्ष संजय सावंत यांनी एका मुलाखतीमध्ये या गोड स्मृतीची काही पान उलगडली. ते ऐकताना खरच तुमच मन भरुन येईल, डोळे पाणावतील. गणेश गल्ली मंडळ आणि दीनानाथ वेलिंग यांचं नातं किती अतूट होतं, हे यातून तुम्हाला समजेल.
डॉक्टरांनी काय सांगितलेलं?
दीनानाथ वेलिंग यांनी मंडळासाठी शेवटची मुर्ती घडवली ते वर्ष होतं 1989. मे 1989 च्या सुमारास दीनानाथ वेलिंग आजारी पडले. महिनाभर ते माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत होतं. त्यावेळी त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च लालाबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने केला होता. त्यावेळी डॉक्टरांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं की, यांनी पुन्हा जर प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये हात टाकला तर मी जबाबदार नाही.
यावर्षी तुम्ही कोणी दुसरा मुर्तीकार बघताय का?
पण वेलिंग यांचा पिंडच मुर्तीकलेचा. त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते मुर्तीचा विषय घेऊन त्यांच्याकडे जात नव्हते. जून, जुलै पर्यंत त्यांनी वाट पाहिली. मग मंडळाला विचारलं, यावर्षी तुम्ही कोणी दुसरा मुर्तीकार बघताय का? दीनानाथ वेलिंग यांच्याकडून अशी विचारणा झाल्यावर मंडळाचे कार्यकर्ते निशब्द झाले. त्यावेळी प्रकृतीच्या कारणास्तवर मोठी मुर्ती बनवता येणार नाही, असं वेलिंग यांनी सांगितलं.
साहेब तुम्ही चार फुटाची मुर्ती बनवली तरी….
त्यावर गणेश गल्लीचे कार्यकर्ते एवढच बोलले, साहेब तुम्ही चार फुटाची मुर्ती बनवली तरी आम्ही 22 फुटाची मानू. त्यावर्षी दीनानाथ वेलिंग यांनी बनवलेली ती शेवटची मुर्ती ठरली. हा प्रसंग ऐकताना खरच डोळ्यात पाणी येतं. अंगावर काटा येतो. हे तुम्ही मंडळाचे उपाध्यक्ष संजय कदम यांच्याकडूनच ऐका. त्यासाठी आम्ही हा व्हिडिओ सुद्धा देत आहोत.