काय आहे BNS चे कलम 82? लागू करण्याची का होत आहे मागणी, हिंदू स्त्रियांप्रमाणे मुस्लिम महिलांना तो अधिकार मिळणार?
Bhartiya Muslim Mahila Andolan Against Polygamy: भारतीय मुस्लिम महिला आंदोलन ही संघटना सध्या विशेष जनसुनावणी घेण्याची तयारी करत आहे. त्यामागे एक मोठे कारण आहे. ही संघटना BNS चे कलम 82 लागू करण्याची मागणी करत आहे. हिंदू स्त्रियांप्रमाणे मुस्लिम महिलांना तो अधिकार मिळणार का?

Muslim Women Against Polygamy: मुस्लिम समाजातील बहुविवाह प्रथेविरोधात मुस्लिम महिला आक्रमक झाल्या आहेत. भारतीय मुस्लिम महिला आंदोलन ही संघटना सध्या विशेष जनसुनावणी घेण्याची तयारी करत आहे. ही संघटना मुंबईत एक विशेष जनसुनावणी घेणार आहे. या सुनावणीत देशामधील सहा राज्यांतील पीडित महिला त्यांचे अनुभव, त्यांची आपबित्ती एका तज्ज्ञ पॅनलसमोर मांडणार आहेत. मुस्लिम महिलांसाठी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 82 लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे मुस्लिम समाजातील बहुविवाह प्रथेला कायदेशीर आळा बसेल असा युक्तीवाद करण्यात आला आहे.
सहा राज्यातील महिला मांडणार त्यांच्या व्यथा
या जनसुनावणीत महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, नवी दिल्ली आणि ओडिशा या सहा राज्यांतील महिला हजेरी लावतील. या महिला बहुविवाह पीडित आहेत. पतीच्या दुसऱ्या लग्नामुळे सामाजिक, आर्थिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या काय परिणाम झाला. आरोग्यावर काय परिणाम झाला. कुटुंबावर आणि मनावर काय परिणाम झाला याची माहिती त्या देणार आहेत. या प्रथेचा त्यांच्या मुलांच्या भविष्यावर आणि शिक्षणावरही दुष्परिणाम झाल्याचा दावा करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आव्हाड, पत्रकार ज्योती पुनवानी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शम्सुद्दीन तांबोली, फिरोज मिठीबोरवाला, झीनत शौकत अली, काझी मेहताब हुसैनी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या पॅनलसमोर ही जनसुनावणी होणार आहे.
त्या अहवालात काय?
BMMA ही संघटना गेल्या दोन वर्षांपासून बहुविवाहाने पीडित महिलांचे हक्क, अधिकार आणि अन्यायासंबंधी अभ्यास करत आहे. बहुविवाहाला बळी पडलेल्या 2500 महिलांचा या संघटनेने सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्याशी संवाद साधला आहे. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. पीडित महिलांच्या माहेरकडील लोकांची बाजू ऐकून घेतली आहे. याविषयीचा एक अहवालही प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल सरकारसमोर ठेवून या पीडितेच्या अडचणींविरोधात आवाज उठवण्यात येणार आहे .
BNS कायद्याचे कलम 82 काय आहे?
भारतीय न्याय संहितामधील(BNS) कलम 82, पूर्वीचे आयपीएस कलम 494 आणि 495 हे पहिला जोडीदार हयात असताना दुसरे लग्न करण्याच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. या कायद्यात, पहिली पत्नी अथवा पती जिवंत असताना दुसरे लग्न केल्यास दोषी व्यक्तीला 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. जोडीदाराला लपवून दुसरे लग्न केल्यास या कायद्यान्वये तो गुन्हा ठरतो. सध्या हा कायदा हिंदू धर्मियांना लागू आहे. मुस्लिम समाजातील पुरुषांना मुस्लिम पर्सनल लॉ अंतर्गत काही अटींसह एकापेक्षा जास्त विवाह करण्याची मुभा आहे.