Shina NC : बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचा शायना एनसी यांना पश्चाताप, माफी मागितली पण त्याचवेळी हे सुद्धा म्हणाल्या की..
Shina NC : शायना एनसी यांनी काल सोनिया गांधी यांच्या ‘जर्नी ऑफ लव’ पुस्तकाची प्रत फाडताना चुकून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला. त्यानंतर चहूबाजूंनी शायना एनसी यांच्यावर टीका सुरु आहे. आज शायना एनसी यांनी पोस्ट करुन माफी मागितली. एक्सवर एक दीर्घ पोस्ट करताना त्यात त्यांनी बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत.

शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी माफी मागितली आहे. काल सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या ‘जर्नी ऑफ लव’ पुस्तकाची प्रत फाडताना शायना एनसी यांनी चुकून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला. आपल्या या कृतीबद्दल शायना एनसी यांनी खऱ्या शिवसैनिकांनी आणि बाळासाहेबांच्या चाहत्यांची माफी मागितली आहे. सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या ‘जर्नी ऑफ लव’ पुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्यात आलाय असा आरोप शिंदे गटाने केला. म्हणून शिंद गटाच्या महिला शिवसैनिकांनी ‘जर्नी ऑफ लव’ पुस्तकाची प्रत फाडली. त्यावेळी शायना एनसी यांनी चुकून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला. “काही माणसं आणि काही नाती आयुष्यभर काळजाच्या एका कोपऱ्यात घर करून राहतात. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझ्या आयुष्यातील असेच पितृतुल्य आणि देवतुल्य व्यक्तिमत्त्व.मी लहान असताना पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटले. ते माझ्या वडिलांचे अत्यंत जिवलग मित्र होते. आमच्या कुटुंबाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक वर्षे त्यांचा अखंड सहवास आम्हाला लाभला, आशीर्वाद मिळाले. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणी, म्हणजेच माझ्या लग्नालाही ते आवर्जून उपस्थित राहिले होते” असं शायना एनसी यांनी आपल्या एक्स पोस्ट मध्ये म्हटलं आहे.
“बाळासाहेब हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे एक अद्वितीय आणि तेजस्वी नेतृत्व होते. प्रखर देशभक्त, कट्टर आणि अभिमानी हिंदू, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निस्सीम चाहते. हिंदुत्वाच्या विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. काँग्रेसच्या विचारधारेविरोधात त्यांनी कायम ठाम आणि निर्भीड भूमिका घेतली. त्यांच्या विचारांमधील स्पष्टता, रोखठोकपणा आणि धगधगते तेज मला नेहमीच प्रेरणा देत आले आहे. कालच्या पत्रकार परिषदेत मी बाळासाहेबांच्या विचारांचा संदर्भ दिला. मात्र, माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. माझा हेतू बाळासाहेबांचा अनादर करण्याचा कधीच नव्हता; उलट, त्यांनी आयुष्यभर जपलेल्या ज्वलंत विचारांमधूनच मी प्रेरणा घेते” असं शायना एनसी यांनी सांगितलं.
मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही
“बाळासाहेबांविषयी तमाम जनतेच्या मनात असलेली श्रद्धा आणि प्रेम मला पूर्णपणे समजते. माझ्यासाठी आणि कोट्यवधी लोकांसाठी बाळासाहेब हे केवळ एक नेते नव्हते, तर दैवत होते. माझ्या कृतीमुळे जर खऱ्या शिवसैनिकांच्या किंवा बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील, तर मी मनापासून त्यांची माफी मागते. पण, ज्यांनी माझ्या या कृतीचा विपर्यास करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मला ठणकावून सांगायचे आहे की—बाळासाहेबांवरचे माझे प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही!” असं शायना एनसी म्हणाल्या.
बाळासाहेब ठाकरे यांना माझा मानाचा मुजरा
“सत्ता आणि स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणाऱ्यांनी मला बाळासाहेब शिकवू नयेत. काही नाती आणि काही ऋणानुबंध तुमच्या सत्तेच्या आणि स्वार्थाच्या राजकारणापलीकडे असतात. बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी हीच माझी खरी ताकद आहे, आणि ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना माझा मानाचा मुजरा!” असं शायना एनसी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
