माझ्या बॅगेत बॉम्ब… दिल्लीला जाणारी फ्लाइट टेकऑफपूर्वी थांबवली; प्रवाशांमध्ये घबराट
मुंबई विमानतळावर एका प्रवाशाने बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिल्याने मोठी खळबळ उडाली. दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण थांबवून सुरक्षा दलांनी तातडीने तपासणी केली. कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळल्याने नंतर विमान रवाना झाले. 'मस्करी' म्हणून केलेल्या या कृत्यामुळे प्रवाशाला अटक करण्यात आली, पण नंतर नोटीस देऊन सोडले. विमानतळ सुरक्षा यंत्रणा अशा खोडसाळपणावर कठोर कारवाई करतात.

मुंबई विमानतळावर बॉम्बचा खोटा इशारा देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई विमानतळावर एका प्रवाशाने माझ्या बॅगेत बॉम्ब आहे, असं सांगताच एकच खळबळ उडाली. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने तात्काळ दिल्लीला जाणाऱ्या फ्लाइटचं उड्डाण रोखलं. टेक ऑफ पूर्वीच उड्डाण रोखण्यात आलं. त्या प्रवाशाला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. काही तास त्याची कसून तपासणी करण्यात आली. त्यानंतर विमानाचं उड्डाण करण्यात आलं.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (T2) बोर्डिंग गेटवर दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटमधील 55 वर्षीय प्रवासी अनुज जयराम सुवर्णा याने हा खोडसाळपणा केला. सुरक्षा तपासणीदरम्यान “माझ्या बॅगेत बॉम्ब आहे” असे अनुजने सांगितल्याने एकच खळबळ उडाली. सीआयएसएफने तात्काळ कारवाई करत प्रवाशाला टेकऑफपूर्वी त्याला विमानातून खाली उतरवून ताब्यात घेतले. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण विमान रिकामे करण्यात आले आणि बॉम्ब शोधक पथकाने विमान, कार्गो आणि सर्व सामानाची सखोल तपासणी केली.
चौकशी करून नोटीस
काही तासांच्या तपासणीनंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यानंतर फ्लाइट दिल्लीकडे रवाना करण्यात आली. सीआयएसएफने आरोपीला पुढील कारवाईसाठी सहार पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीत आरोपीने “मी मजेत बोललो” असा दावा केला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती. मात्र नंतर इशारा नोटीस देऊन सोडण्यात आले. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.
मस्करी गंभीर घेतली जाते
पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावर सुरक्षेशी संबंधित प्रकरणात खोडसाळपणा करणं, मस्करी करणं अत्यंत गंभीर घेतलं जातं. प्रवाशाच्या याच खोडसाळपणामुळे इतर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण तापलं. तसेच लोकांमध्ये घबराट पसरली. तसेच इतर विमानांची उड्डाणेही प्रभावित झाली. त्यामुळे एअरलाईनला परिचालन आणि आर्थिक नुकसान सोसावं लागलं. आम्ही आरोपीला नोटीस दिली आहे. पण या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. विमानतळावरील सुरक्षेशी संबंधित संवेदनशील प्रकरणात कोणताही निष्काळजीपणा किंवा दिशाभूल करणाऱ्या गोष्टींच्या विरोधात आम्ही कठोर कारवाई करतो, असं पोलिसांनी म्हटलं आहे.