‘नाणार प्रोजेक्ट’ आता कृष्णकुंजवर; प्रकल्पग्रस्त राज ठाकरेंना भेटणार

| Updated on: Mar 08, 2021 | 7:57 AM

नाणारचे प्रकल्पग्रस्त रविवारी रात्रीच बसने मुंबईला रवाना झाले. थोड्याचवेळात साधारण 11 वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण कृष्णकुंजवर पोहोचतील. | Raj Thackeray Nanar Refinery Project

नाणार प्रोजेक्ट आता कृष्णकुंजवर; प्रकल्पग्रस्त राज ठाकरेंना भेटणार
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
Follow us on

मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पुढाकारामुळे आता रत्नागिरीच्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा (Nanar Refinery Project)  मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कालच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाणार प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊन देऊ नका, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे राज्य सरकारने गुंडाळलेल्या नाणार प्रकल्पाची फाईल पुन्हा उघडणार असल्याची चर्चा आहे. (Nanar Refinery Project in Ratnagiri)

या पार्श्वभूमीवर सोमवारी नाणारमधील काही प्रकल्पग्रस्त राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी ही बैठक पार पडेल. त्यासाठी नाणारचे प्रकल्पग्रस्त रविवारी रात्रीच बसने मुंबईला रवाना झाले. थोड्याचवेळात साधारण 11 वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण कृष्णकुंजवर पोहोचतील.

प्राथमिक माहितीनुसार, नाणार पंचक्रोशीतील जवळपास 100 प्रकल्पग्रस्त राज ठाकरे यांची भेट घेतील. यापैकी बहुतांश जण हे जमीन मालक आहेत. याशिवाय, नाणार रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समितीचे अध्यक्षही या बैठकीला उपस्थित राहतील. यावेळी राज ठाकरे यांच्यापुढे नाणारमधील तब्बल 8500 जमीन मालकांची संमतीपत्रेही सादर करण्यात येतील. त्यामुळे आता राज ठाकरे नाणारच्या मुद्द्यावरुन आक्रमक होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राज ठाकरेंनी पत्रात नेमंक काय म्हटलंय?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ म्हणजे नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं आहे. ‘नाणार रिफायनरी’ प्रकल्प गमावणं राज्याला परवडणारं नाही. राज्याचं अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर या प्रकल्पाबाबत सामंजस्याने भूमिका घ्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

मनसे सहकार्य करणार, आराखडाही देणार

सरकारने नाणारबाबत सकारात्मक भूमिका घेतली तर मी आणि माझा पक्ष संपूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. एवढंच नव्हे तर पर्यावरण आणि पर्यटनाच्या अनुषंगाने एक विकास आराखडा तयार करून आम्ही तो आपणांस सादर करू, असं सांगतानाच सद्यपरिस्थितीत महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी असे निर्णय घेणं ही काळाची गरज आहे. कोणी काहीही म्हणू दे .. महाराष्ट्र फर्स्ट .. असं धडाकेबाज धोरण असायला हवं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

‘नाणार प्रकल्प’ हातातून गमावू नका, राज्याला परवडणार नाही; राज ठाकरेंचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं

नाणारमध्ये 221 गुजराती भूमाफियांच्या जमिनी; राज ठाकरेंचं अचानक मनपरिवर्तन कसं झालं: विनायक राऊत

हिंमत असेल तर राज यांनी नाणारवासियांसमोर भूमिका मांडावी; शिवसेनेचं आव्हान

(Nanar Refinery Project in Ratnagiri)