नवी मुंबईत अतिवेगाने गाडी चालवण्यावर ब्रेक, वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

| Updated on: Jun 25, 2020 | 12:30 AM

वाहन चालकांनी वेग मर्यादेचे उल्लंघन न करता मर्यादित वेगाने वाहने चालविण्याची सूचना नवी मुंबई महामार्ग पोलिसांकडून करण्यात आली आहे.

नवी मुंबईत अतिवेगाने गाडी चालवण्यावर ब्रेक, वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई
Follow us on

नवी मुंबईत : रस्ते अपघात आणि त्यातील मृत्यूचे प्रमाण कमी (Navi Mumbai Police Violation Of Speed Limit) करण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून वाहन चालकांवर वेगवेगळ्या पद्धतीने कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. तरी, बहुतेक वाहन चालकांकडून वेगमर्यादेचं उल्लंघन करण्यात येत असल्याचं आढळून आले आहे. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, वाहनाने दोन निश्‍चित ठिकाणांतील अंतर किती वेळेत पार केले, याची माहिती टोल नाक्यावरील सीसीटीव्ही आणि इतर माध्यमातून मिळवून, वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे (Navi Mumbai Police Violation Of Speed Limit).

त्यामुळे वाहन चालकांनी वेग मर्यादेचे उल्लंघन न करता मर्यादित वेगाने वाहने चालविण्याची सुचना करण्यात आली आहे. अन्यथा अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महामार्ग पोलिसांकडून देण्यात आला आहे.

दरवर्षी देशभरातील रस्ते अपघातात सुमारे 1 लाख 30 हजार लोक मृत्युमुखी पडतात. तर, सुमारे 2 लाख लोक कायमचे जायबंदी होतात. यातील बहुतांश लोक 15 ते 45 वर्षे या कमावत्या वयोगटातील तरुण असतात. त्यामुळे महामार्ग पोलिसांकडून रस्त्यावरील अपघात आणि त्यातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

त्याशिवाय, वाहन चालकांवर वेगवेगळ्या पद्धतीने कारवाई देखील करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर देखील बहुतेक वाहन चालक वेगमर्यादेचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले आहे. अतिवेगाने वाहन चालवणे हे रस्त्यावरील प्राणघातक अपघातांचे सर्वात महत्त्वाचे कारण असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांना ब्रेक लावण्यासाठी महामार्ग पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दोन निश्‍चित ठिकाणांतील अंतर वाहनाने किती वेळेत पार केले, याची माहिती मिळवून अतिवेगवान वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे (Navi Mumbai Police Violation Of Speed Limit).

“वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. रस्त्यावरील मर्यादा वेगवेगळ्या वाहनांसाठी निर्धारित करणारी अधिसूचना या आधीच जारी केली आहे. लॉकडाऊनमध्येही अपघात व्हायचे ते झालेच. दोन निश्चित ठिकाणातील अंतर किती वेळेत पार केले, याची सीसीटीव्ही फुटेज माध्यमातून माहिती घेऊन अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करु”, अशी माहिती महामार्ग पोलीस अधीक्षक डॉ. दिगंम्बर प्रधान यांनी दिली.

महामार्ग पोलिसांकडून राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि अन्य रस्त्यांसाठी वेगवेगळी वेगमर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. तशा आशयाची अधिसूचना महामार्ग पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी 25 ऑक्टोबर 2019 रोजी प्रसिध्द केली होती.

महामार्ग पोलीस आणि स्थानिक वाहतूक पोलिसांकडून विविध रस्त्यांवरील टोल नाक्यावरील सीसीटीव्ही आणि इतर माध्यमातून अतिवेगवान वाहनांची माहिती मिळविण्यात येत असून त्याआधारे वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व मोटारसायकल चालक, प्रवासी कार तसेच अवजड वाहनांनी वेग मर्यादेचे उल्लंघन न करता मर्यादित वेगाने वाहन चालवण्याची सुचना करण्यात आली आहे. तसेच, या सूचनेचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महामार्ग पोलिसांकडून देण्यात आला आहे (Navi Mumbai Police Violation Of Speed Limit).

संबंधित बातम्या :

नवी मुंबईकरांच्या चिंतेत भर, 321 कोरोना रुग्णांची वाढ, तर मुंबईत रुग्णवाढीचा वेग मंदावला

नवी मुंबई मेट्रोला चीनचे डबे, प्रकल्प पूर्ण करण्याबाबत ‘सिडको’ला चिंता