Navnath Ban: संजय राऊत म्हणजे मातोश्रीच्या कुंडलीतील अमंगल ग्रह, दिशा सालियन प्रकरणावरून नवनाथ बन यांचा तुफान हल्लाबोल
Navnath Ban on Sanjay Raut : दिशा सालियन मृत्यूप्रकरणात खासदार संजय राऊत यांनी भाजपसह राणेंवर गंभीर आरोप केले. त्यानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी आक्रमक शैलीत त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. काय म्हणाले बन?

ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत दिशा सालियन प्रकरणात ठाकरे कुटुंबाला नाहक बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप केला. त्यांनी राणे आणि भाजपवर निशाणा साधला. त्यांच्या वक्तव्याचा भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी आक्रमक शैलीत समाचार घेतला. राऊत हे मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय कुंडलीतील अमंगल ग्रह असल्याचा आरोप बन यांनी केला. त्यांनी महाविकास आघाडीची अडीच वर्षे सत्ता होती, तेव्हा कणकवली प्रकरणाची चौकशी का केली नाही? असा सवाल उपस्थित केला.
राणे कुटुंबावर आरोप करण्यापूर्वी पुरावे समोर ठेवा
दिशा सालियन प्रकरणावर बोलताना बन यांनी राऊतांवर टीका केली. दिशा सालियन प्रकरण जिवंत ठेवून आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा संजय राऊतांचा डाव असल्याचा आरोप केला. आदित्य ठाकरेंना राजकीय पटलावरून दूर करण्यासाठी संजय राऊतांचे षडयंत्र? असल्याचा दावा केला. दिशा सालियन प्रकरणावर राऊत रोज बोलतात, त्यांच्याकडे पुरावे असतील तर तपास यंत्रणांसमोर सादर करा. आदित्य ठाकरेंविरोधातील राजकीय वैरातून दिशा सालियन प्रकरणाचा वापर? राऊतांनी पुरावे द्यावेत, असे बन म्हणाले.
पाटकर फाईलचा मुद्दा चर्चेत
‘ईव्हीएम फाईल’च्या गप्पांपूर्वी ‘पाटकर फाईल’चा इतिहास महाराष्ट्राला सांगा असा सल्ला बन यांनी दिला.मोदीजींवर आणि भागवतजींवर टीका करण्यापूर्वी संजय राऊतांनी स्वतःच्या ‘पाटकर फाईल’कडे पाहावं. ‘फाईल’च्या राजकारणापेक्षा स्वतःच्या आरोप-प्रत्यारोपांचा इतिहास महाराष्ट्राला आठवतोय. मोदीजींना जनतेचा तिसऱ्यांदा कौल; राऊतांनी आधी आपल्या राजकीय इतिहासाचं आत्मपरीक्षण करावं, असा टोला बन यांनी लगावला.
महाविकास आघाडीचाच फुटबॉल झालाय
ममता बॅनर्जींच्या राजकारणाचं समर्थन करण्याआधी पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा इतिहास पाहा. गुंडशाहीच्या आरोपांनी गाजलेल्या राजकारणाचं समर्थन राऊतांनी करू नये. पश्चिम बंगालच्या जनतेने दिलेला कौल विसरून ममता बॅनर्जींची पाठराखण का? ममतांच्या राजकारणावर प्रश्न उपस्थित झाले, मग संजय राऊतांना त्यांचं समर्थन कशासाठी? असा सवाल बन यांनी विचारला.
ममतांना फुटबॉलचं चिन्ह मिळालं, जनतेने मात्र महाविकास आघाडीचा राजकीय फुटबॉल केला असा टोला त्यांनी लगावला. निवडणूक आयोगावर आरोप करण्यापूर्वी संजय राऊतांनी जनतेच्या नकाराचं आत्मपरीक्षण करावं. राहुल गांधींची स्तुती आणि निवडणूक आयोगावर टीका; राऊतांच्या राजकारणात एवढंच उरलंय. जनतेने नाकारलं म्हणून निवडणूक आयोगाला दोष देऊ नका तर आधी आत्मपरीक्षण करा, असा टोलाही राऊतांना बन यांनी लगावला.