Rupali Chakankar: संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला… अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर आक्रमक… आता थेट कायदेशीर कारवाईचा इशारा
Rupali Chakankar on Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यांनी बदनामी करणाऱ्यांना मोठा इशाराही दिला.

Rupali Chakankar on Ashok Kharat Case: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर रूपाली चाकणकर यांनी सोशल मीडियातून भूमिका मांडली. अशोक खरातशी माझा कुठलाही आर्थिक संबंध नव्हता. त्याच्या कुठल्याही जमीन व्यवहारात माझी पार्टनरशिप नव्हती. खरातकडे मी कुठल्याही महिलेला घेऊन गेले नाही असे चाकणकर यांनी स्पष्ट केले. खरात प्रकरणात माझी बदनामी करण्यात आली या प्रकरणात बदनामी करणाऱ्या विरोधात मी आता कायदेशीर कारवाई करणार असा इशाराही त्यांनी दिला. तर अनेकांना कायदेशीर नोटीस पाठवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल
रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून एक पोस्ट केली आहे. खरात प्रकरणात पहिल्या दिवसापासूनची माझी भूमिका ठाम आणि स्पष्ट होती. खरातच्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी, जमिनीच्या पार्टनरशिपशी दुराव्यानेही माझा संबंध नव्हता. मी कधी कोणत्याही महिलेला खरातकडे घेऊन गेले नाही. ना माझा आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ होता. पण तरीही गेल्या दीड दोन महिन्यांपासून अतिशय अश्लील, अश्लाघ्य भाषेत विधानं करत कोणताही पुरावा नसताना माझ्यावर, माझ्या कुटुंबावरती आरोप करण्यात आले. ते अतिशय वेदनादायक होते, अशा भावना त्यांनी या पोस्टमधून व्यक्त केल्या.
लढा स्त्रीत्वाचा…!
स्त्री सन्मानासाठी…!विकृत मनोवृत्तीच्या विरोधातील कायदेशीर लढाई…….!! pic.twitter.com/QWNnpJNyUY
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) June 10, 2026
आता कायदेशीर लढा
तर यावेळी रुपाली चाकणकर यांनी बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर लढा देणार असल्याचे म्हटले आहे. इतरांप्रमाणेच माझ्या कुटुंबियांनी खरात याला गुरू मानले होते. जो पाद्यपूजेचा व्हिडिओ होता, तो अतिशय जुना व्हिडिओ होता. त्यावेळेस मी आयोगाची अध्यक्षही नव्हते. खरात प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे व्हावा, यासाठी मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि प्रदेशाध्यक्ष पदाचा अशा दोन्ही पदांचा राजीनामा दिला. तरी सुद्धा ज्या पद्धतीची चिखलफेक झाली. AI चा वापर करून ज्या पद्धतीचे व्हिडिओ तयार करण्यात आले. सातत्याने बदनाम करण्याचे षडयंत्र रचलं गेलं. त्यासाठी आता कायद्याच्या चौकटीतून लढाई लढणार आहे. आशा मिरगे यांना आतापर्यंत मी तीन नोटीस पाठवल्यात मात्र त्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत. म्हणून मी कोर्टाच्या माध्यमातून त्यांच्या फिर्याद दाखल केली दोन जुलै रोजी त्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती चाकणकर यांनी दिली.