मंत्रालयाच्या कँटीनच्या तपासणीचे आदेश; कोर्टाने झापताच कँटीनची साफसफाई सुरू

मुंबई उच्च न्यायालयाने आज एफडीएची चांगलीच कानउघाडणी केली. मंत्रालयाच्या कँटीनमध्ये एकही कीटक नसल्याचं म्हणणं हस्यास्पद आहे. एवढ्या मोठ्या कँटीनमध्ये कीटक असूच शकत नाही का? असा सवाल करतानाच फक्त खासगी अस्थापनांनाच टार्गेट करू नका. सर्वांना समान वागणूक द्या, अशी समजच कोर्टाने एफडीएला दिली आहे.

मंत्रालयाच्या कँटीनच्या तपासणीचे आदेश; कोर्टाने झापताच कँटीनची साफसफाई सुरू
mumbai high court
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 31, 2026 | 1:07 PM

मंत्रालयातील कँटीनमध्ये साधा कीटकही आढळला नसल्याचं आज एफडीएने कोर्टात म्हटलं होतं. त्यावर कोर्टाने एफडीएची चांगलीच कान उघाडणी केली आहे. मंत्रालयाच्या कँटीनमध्ये कीटक नाही म्हणणे हस्यास्पद आहे, असं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने आज दुपारपर्यंत मंत्रालयाची कँटीन तपासणीचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे चार वकील आणि एफडीएचे अधिकारी आज मंत्रालयात जाऊन तपास करणार आहेत. त्यानंतर कोर्टात अहवाल देण्यात येणार आहे.

हॉटेलचालकानी एफडीएविरोधात केलेल्या याचिकेवर हायकोर्टात आज सुनावणी झाली. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. यावेळी एफडीएच्या तपासणीत मंत्रालयातल्या उपहागृहात कोणतेही कीटक आढळले नाहीत, असा दावा सरकारी वकिलांनी केला. या दाव्यावर न्यायाधीश रवींद्र घुगे यांनी आक्षेप घेतला. मंत्रालयातल्या एवढ्या मोठ्या उपहारगृहात साधा एक कीटक नाही म्हणणे हे हास्यास्पद आहे, अशा शब्दात न्यायाधीश घुगे यांनी कान उघाडणी केली.

कठोर भूमिका घेतली तर चालेल का?

मोठमोठ्या फाईव्हस्टार हॉटेलमध्येही माशी किंवा झुरळ आढळून येतात. मग मंत्रालयातले कँटीन एवढे साफ आहे असे म्हणणे पटते का? असा सरकारी वकिलांनाच न्यायाधीशांनी सवाल केला. आम्ही 4 वाजेपर्यंत मंत्रालयातले कँटीन तपासण्यांचे आदेश दिले आहेत आणि त्यात कीटक आढळले तर आम्ही कठोर भूमिका घेतली तर चालेल का?, असा सवालच न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना केला.

व्हिडीओग्राफी करा

त्यानंतर हायकोर्टाने मंत्रालयाच्या कँटीनची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले. चार वकील आणि एफडीएचे अधिकाऱ्यांनी स्वतः मंत्रालयात जाऊन कँटीनची तपसणी करण्याचे आदेश दिले आहेत. 3 वाजेपर्यंत तपासणी करा आणि पुन्हा हायकोर्टात या, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. तसेच मंत्राालयाच्या कँटीनच्या तपासणीची व्हिडीओग्राफी करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.

समान तपासणी व्हावी

मुंबई उच्च न्यायालयाकडून एफडीएची चांगलीच कान उघाडणी करण्यात आली. केवळ खासगी आस्थापनांना लक्ष्य करणं चुकीचं आहे. कारवाई सगळ्यांवर समान झाली पाहिजे, असं कोर्टाने म्हटलं. यावेळी एफडीएच्या वकिलांनी उत्तर द्यायला वेळ मागून घेतला. आता दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.

दणका बसताच स्वच्छता

दरम्यान, कोर्टाने कँटीन तपासणीचे आदेश देताच मंत्रालयातील कँटीनमध्ये स्वच्छता करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांना कोणताही दोष आढळणार नाही याची काळजी घेतली जात आहे. किचनपासून ते जेवणाच्या टेबलपर्यंत स्वच्छता केली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us