Savarkar statue | काँग्रेस ICU मध्ये, सावरकर द्वेषाचं सलाईनही त्यांना वाचवू शकणार नाही : रणजीत सावरकर

| Updated on: Aug 23, 2019 | 3:56 PM

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार दिल्ली विद्यापीठात (DU) घडला आहे.

Savarkar statue | काँग्रेस ICU मध्ये, सावरकर द्वेषाचं सलाईनही त्यांना वाचवू शकणार नाही : रणजीत सावरकर
Follow us on

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार दिल्ली विद्यापीठात (DU) घडला आहे. काँग्रेसप्रणित भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या (National Students’ Union of India- NSUI)  अध्यक्षाने गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी हे कृत्य केलं. विद्यापीठ कॅम्पसमध्ये सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांच्या पुतळ्याशेजारी सावरकरांचा पुतळा बसवण्यावरुन वाद झाला होता. त्यानंतर एनएसयूआयच्या (National Students’ Union of India- NSUI)  दिल्ली अध्यक्षाने विटंबना केली.

या प्रकारानंतर सावरकरांचे वंशज आणि सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष रणजीत सावरकर यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.

“हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. काँग्रेससारखी खोटारडा प्रचार करणारी संघनटा देशात दुसरी कोणती नाही. सावरकरांनी 5 वेळा माफी मागितली हे खोटं आहे. त्यावेळचा सर्व प्रकार महात्मा गांधींना माहित होता. काँग्रेसकडून खोटा प्रचार सुरु आहे. 1920 मध्ये गांधी म्हणाले होते – सावकर हे थोर क्रांतीकारक, देशभक्त, शूर आहेत. त्यामुळे काँग्रेसवाले महात्मा गांधींपेक्षा स्वत:ला मोठं समजतात का”? असा प्रश्न रणजीत सावकर यांनी विचारला.

सत्ता गेल्याने हे संतप्त आहेत. यांचं पेशंट आयसीयूमध्ये आहे, सावरकर द्वेषाचं सलाईन लावून पण जगू शकणार नाही. आजची तुमची मानसिकता सुधारा, अन्यथा जनता तुम्हाला माफ करणार नाही. तुमचे अध्यक्ष उरलेच नाहीत, आता संघटना पण राहणार नाही, असा संताप रणजीत सावकर यांनी व्यक्त केला.

सचिन सावंत यांची प्रतिक्रिया

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेलं कृत्य निश्चित चुकीचं आहे. ही काँग्रेसची संस्कृती नाही. पण सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांच्या पुतळ्याबरोबर सावरकरांचा पुतळा लावणं चुकीचं आहे. त्या दोघांच्या विचारात खूप फरक होता. अभाविपनंच हा पुतळा बसवला होता, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली.

काय आहे नेमकं प्रकरण?

भाजपशी संबंधित विद्यार्थी संघटना ABVP अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मंगळवारी कला विभागाबाहेर स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंह आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पुतळे बसवले होते. मात्र काँग्रेसप्रणित भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना अर्थात NSUI ने त्याला आक्षेप घेतला. सावकरांना भगतसिंह आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत स्थान दिलं जाऊ शकत नाही, असं म्हणत गुरुवारी रात्री NSUI चा दिल्ली अध्यक्ष अक्षय लाक्राने सावरकरांच्या पुतळ्याला काळं फासून चपलांचा हार घातला. अक्षय लाक्रासोबत जवळपास 20 कार्यकर्ते होते.

अक्षय लाक्रा म्हणाला, “अभाविप हे भगतसिंह आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत सावरकरांचा पुतळा कसं काय ठेवू शकतात? रातोरात त्यांनी पुतळे बसवले. त्यामुळे आम्हाला हे प्रकरण आपल्या हाती घ्यावं लागलं. दिल्ली विद्यापीठाचे प्रशासनही याप्रकरणी गप्प होते. प्रशासन एबीव्हीपीच्या इशाऱ्याने काम करत आहे”.