Parle-G: पार्ले-जी बिस्किटची फॅक्टरी होणार जमीनदोस्त; त्याच जागी काय बांधणार?

लहानांपासून मोठ्यांपर्यंत.. आयुष्यात एकदा तरी 'पार्ले-जी' बिस्किट खाल्लं नाही, अशी व्यक्ती सापडणं कठीण आहे. अगदी गरीबांच्या खिशाला परवडणाऱ्या या बिस्किटचा मुंबईतल्या विलेपार्ले इथं कारखाना आहे. परंतु आता हा कारखाना आता लवकरच जमीनदोस्त होणार आहे.

Parle-G: पार्ले-जी बिस्किटची फॅक्टरी होणार जमीनदोस्त; त्याच जागी काय बांधणार?
Parle g factory
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 26, 2026 | 3:18 PM

खिशाला परवडणारी, चविष्ट आणि लोकप्रिय.. अशी ‘पार्ले-जी’ या बिस्किटाची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या बिस्किटाने आपली लोकप्रियचा कायम ठेवली आहे. मुंबईतल्या विलेपार्ले इथं ‘पार्ले-जी’ बिस्किट कंपनीची इमारत आहे. परंतु आता हीच ऐतिहासिक इमारत पाडली जाणार आहे. या इमारतीने लाखो लोकांच्या आठवणी गेल्या अनेक दशकांपासून जपल्या आहेत. विलेपार्ले पूर्व इथल्या 97 वर्षे जुन्या ‘पार्ले-जी’ कारखान्याच्या जागेवर आता एक मोठं व्यावसायिक संकुल (कमर्शिअल कॉम्प्लेक्स) बांधण्याची योजना आखण्यात आली आहे.

प्रस्तावाला मंजुरी

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या (MoEFCC) अंतर्गत येणाऱ्या स्टेट एनवायरनमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट अथॉरिटीने (SEIAA) 7 जानेवारी रोजी या प्रकल्पाला अंशत: मंजुरी दिली होती. या मंजुरीमुळे परिसरातील 21 जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती पाडण्याची परवानगी मिळाली आहे. 2025 मध्ये सादर केलेला हा प्रस्ताव अखेर मंजूर झाला आहे.

प्रकल्पाचा बजेट

या 5.44 हेक्टर भूखंडाचा पुनर्विकास प्रस्तावित आहे. याचा पूर्ण बांधकाम परिसर हा 1,90,360.52 चौरस मीटर आहे. या प्रकल्पाची अंदाजे किंमत 3,961.39 कोटी रुपये आहे. या जागेवर आता चार इमारती आणि दोन स्वतंत्र पार्किंग टॉवर बांधले जाणार आहेत. या इमारती तीन आणि सहा मजली असतील.

ऑक्टोबर 2025 मध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) विमानतळापासून जवळ असल्याने आणि एअर फनेल झोनमध्ये येत असल्याने उंचीच्या मर्यादांसह ना हरकत प्रमाणपत्र (NOC) जारी केलं होतं. त्यानुसार, एका इमारतीची उंची 30.40 मीटर आणि दुसऱ्याची 28.81 मीटर निश्चित करण्यात आली होती. पर्यावरणीय मंजुरी कागदपत्रांनुसार, कंपनीने एका इमारतीसाठी 30.70 मीटर उंचीची विनंती केली आहे, जी या मर्यादेपेक्षा से 0.30 मीटरने जास्त आहे.

कॉम्प्लेक्स कसा असेल?

प्रस्तावित सर्व चार इमारतींमध्ये दोन बेसमेंट लेव्हल असतील. पहिल्या तीन इमारतींच्या A विंगमध्ये सहा मजले असतील. इमारत क्रमांत 1 च्या B विंगचा काही भाग व्यावसायिक वापरासाठी राखीव असेल. तर पहिला, सातवा आणि आठवा मजला दुकानं आणि कार्यालयांसाठी प्रस्तावित आहेत. दुसऱ्या ते सहाव्या मजल्यापर्यंत पार्किंगचीही व्यवस्था असेल. या कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये रिटेल दुकानं, रेस्टॉरंट आणि फूड कोर्टसुद्धा सहभागी असण्याची शक्यता आहे.