काल घोषणा, आज स्थगिती, पोलीस भरती पुढे ढकलली, आता पुढे काय?

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीची परीक्षा लवकरच जाहीर होईल, असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार काल पोलीस भरती जाहीर झाली. पण आज ही भरती पुढे ढकलल्याची माहिती समोर आली आहे.

काल घोषणा, आज स्थगिती, पोलीस भरती पुढे ढकलली, आता पुढे काय?
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Oct 29, 2022 | 4:38 PM

मुंबई : राज्य पोलीस मुख्यालयाकडून नुकतंच 14 हजार 956 जागांसाठी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. ही पोलीस भरती येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार होती. पण पोलीस भरती जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या भरतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती आता पुढे ढकलण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासकीय कारणास्तव ही पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. या भरतीची नवी जाहीरात लवकरच प्रकाशित होणार आहे.

खरंतर राज्यातील हजारो तरुण या पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी तयारी करत आहेत. काही तरुणांनी तर पोलीस भरतीसाठी आंदोलन केल्याचंदेखील समोर आलं होतं. या दरम्यान राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीची परीक्षा लवकरच जाहीर होईल, असं आश्वासन दिलं होतं.

देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर राज्यात 14 हजार 956 जागांसाठी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. पण पोलीस भरतीची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही पोलीस भरती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

खरंतर नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी 3 नोव्हेंबरला अर्ज भरायला सुरुवात होणार होती. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. पण त्यांचा पुन्हा हिरमोड झाला. कारण आज पोलीस महासंचालक कार्यालयाकडून एक प्रसिद्धपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यामध्ये प्रशासकीय कारणास्तव भरती स्थगित करण्यात असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच भरतीबाबत नवी जाहीरात लवकर जाहीर करण्यात येईल, असंदेखील प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.