सत्तेत आल्यास संसद भवनाचं पुन्हा उद्घाटन करू, मोदी यांच्या नावाची नेम प्लेट काढून टाकू; प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान

आमची अरविंद केजरीवाल यांना सहानुभूती आहे. पण आम्ही मात्र, त्यांच्यासोबत आहोत असं नाही, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सत्तेत आल्यास संसद भवनाचं पुन्हा उद्घाटन करू, मोदी यांच्या नावाची नेम प्लेट काढून टाकू; प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान
prakash ambedkar
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 25, 2023 | 9:32 AM

मुंबई : येत्या 28 मे रोजी देशाच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मात्र, विरोधी पक्षाने या संसद भवनाच्या सोहळ्याला विरोध केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात यावं अशी मागमी विरोधकांनी केली आहे. तर या संसद भवनाच्या उद्घाटनावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची सत्ता गेली आणि आम्ही सत्तेत आलो तर संसद भवनाचं पुन्हा उद्घाटन करू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तेच आम्ही उद्घाटन करू. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची संसद भवनावरील नेम प्लेटही काढून टाकू, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

वंचित बहुजन आघाडीने भांडुप येथे संविधान बचाव सभा आयोजित केली होती. यावेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते. मोदी प्रचंड प्रसिद्धीलोलूप आहेत. प्रसिद्धीसाठी हावरट आणि हपापलेले आहेत. त्यांना बाजूला मंत्रीही चालत नाही. सेक्युरिटी गार्डही नकोस असतो. उद्घाटनाच्या दगडावर फक्त माझंच नाव हवं असा त्यांचा हेतू असतो. त्यांना संघाचा सपोर्ट आहे, असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी केला.

उद्धव ठाकरेंना सल्ला

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीपासून सावध राण्याचा सल्लाही दिला. शिवसेनेला आम्ही सावध करतोय. वेळीच सावध व्हा. भाजपकडून जे ईडीचे डाव टाकले जात आहेत. त्यात राष्ट्रवादी अडकणार आहे. तर काँग्रेस नेते नाना पटोले कधी गरम तर कधी नरम बोलत आहे. त्यामुळे पटोले यांनी भूमिकाही तपासून घ्या. नाही तर तुमचा बळी जाईल. म्हणूनच तुम्हाला सावध करत आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आम्ही त्यांच्यासोबत नाही

दिल्ली सरकार विरोधात केंद्र सरकारने अध्यादेश काढला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमची अरविंद केजरीवाल यांना सहानुभूती आहे. पण आम्ही मात्र, त्यांच्यासोबत आहोत असं नाही, असंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी म्हणते वंचितला जागा देणार नाही. पण आम्ही त्यांना जागा दिल्याच नाही. ज्याला सत्तेत जायचं आहे, त्याला आम्हाला सोबत घेतल्याशिवाय सत्तेत जाता येणार नाही, असंही ते म्हणाले.

तर भाजप 48 जागा जिंकेल

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस वेगळी लढली आणि राष्ट्रवादीचे काही नेते भाजपमध्ये गेले तर भाजप 48 जागा जिंकू शकतो, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं त्यांनी स्पष्ट केलं. ज्यांच्यावर ईडी लागली आहे. त्यांच्यासमोर जेल की स्वातंत्र्य हे दोन पर्याय असेल. तेव्हा भाजप त्यांना आपल्यात सामावून घेईल. तेव्हा आश्चर्य वाटून घेऊ नका, असंही ते म्हणाले.