Maratha Reservation: हुकूमाची पानं मोदींच्या हातात असतील तर तुमची गरजच काय, प्रविण दरेकरांचा राऊतांना टोला

| Updated on: May 29, 2021 | 11:23 AM

महाविकासआघाडी कायम आपल्याला जमत नाही ती गोष्ट केंद्रावर ढकलण्याचे काम करते. संजय राऊत यांना तर रोज उठून मोदी आणि भाजपवर बोलल्याशिवाय चैन पडत नाही | Pravin Darekar

Maratha Reservation: हुकूमाची पानं मोदींच्या हातात असतील तर तुमची गरजच काय, प्रविण दरेकरांचा राऊतांना टोला
प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद.
Follow us on

मुंबई: आजपर्यंत शिवसेना आणि महाविकासआघाडी सरकारने नेहमीच आपल्याकडची कुठलीही गोष्ट केंद्रावर ढकलायचेच काम केले. आताही मराठा आरक्षणासंदर्भात हुकूमाची पानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणत आहेत. हुकूमाची पानं त्यांच्या हातातच असतील तर मग तुमची गरजच काय, असा सवाल भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी उपस्थित केला. (BJP leader Pravin Darekar slams Mahaviaks Agahdi over Maratha Reservation)

प्रविण दरेकर यांनी शनिवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणप्रश्नी केंद्र सरकारला पेचात पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजय राऊत यांना फटकारले. भाजपला मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची जाणीव आहे. मात्र, महाविकासआघाडी कायम आपल्याला जमत नाही ती गोष्ट केंद्रावर ढकलण्याचे काम करते. संजय राऊत यांना तर रोज उठून मोदी आणि भाजपवर बोलल्याशिवाय चैन पडत नाही, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली.

‘राज्यपालांना पत्र देऊन आरक्षण मिळवणं इतकं सोपं आहे का?’

महाविकासआघाडीच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षणासाठी राज्यपालांना पत्र दिलं होतं. मात्र, त्या माध्यमातून आरक्षण मिळवणं इतकं सोपं आहे का?, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. त्यासाठी प्रस्ताव सादर करावा लागेल. मग राष्ट्रपतींच्या माध्यमातून तो आयोगाकडे पाठवावा लागेल. यासाठी बराच वेळ जाईल. मात्र, ठाकरे सरकार सर्व गोष्टी केंद्रावर ढकलून दिशाभूल करत आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.

मराठा आरक्षणाच्या हुकूमाची पाने मोदींच्याच हाती: संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या हातात टोलवला आहे. मराठा आरक्षणाची हुकूमी पानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हाती आहेत. त्यांनीच ही पानं टाकावीत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी दिलेल्या इशाऱ्याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे उत्तर दिलं. महाराष्ट्रातील प्रत्येक नेता संभाजी छत्रपती यांच्या मताशी सहमत आहे. त्यामुळे सर्व उठून मोदींकडे जाऊया. त्यात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असा विषय नाही. सर्वांनीच मोदींना भेटलं पाहिजे. कारण मोदींच्या हातीच आता हुकूमाची पानं आहेत. त्यांनीच ती टाकावी, असे राऊत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

निर्णय घेताना समाजाचा विचार करा, स्वार्थ पाहू नका; प्रसाद लाड यांचे संभाजीराजेंना आवाहन

खासदार संभाजी छत्रपती नवीन पक्ष स्थापन करणार?, सोशल मीडियात जोरदार चर्चा; आंबेडकरांचीही शनिवारी भेट घेणार

बघू कोण किती प्रामाणिक आहे ते?; मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा भाजपला इशारा

(BJP leader Pravin Darekar slams Mahaviaks Agahdi over Maratha Reservation)