पुण्यात कोर्टाच्या आवारातच धाड धाड गोळीबार… संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, थेट गृहखात्यावरच…

पुण्यात कोर्टात दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबारानंतर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था रसातळाला गेल्याचे सांगत त्यांनी थेट गृहखात्यावर हल्ला चढवला. राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत, पोलीस राजकीय कामांत गुंतले असून गुंडांना अभय मिळत असल्याचा आरोप केला. पुणे आता गुंडांचे माहेरघर बनल्याची टीकाही त्यांनी केली.

पुण्यात कोर्टाच्या आवारातच धाड धाड गोळीबार... संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, थेट गृहखात्यावरच...
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2026 | 11:13 AM

पुण्यात काल दिवसाढवळ्या कोर्टाच्या आवारात गोळीबार आणि कोयत्याने वार करण्यात आले. असंख्य पोलीस, वकील आणि जनतेच्या समोरच हा हल्ला करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेवरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचं सांगत थेट गृहखात्यावरच हल्ला चढवला आहे. राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे. मीडियाशी संवाद साधत असताना राऊत यांनी ही मागणी केली आहे.

महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. हे वारंवार आम्ही सांगत आहोत. मुंबई असेल पुणे असेल आणि नागपूर सुद्धा. या सर्वच ठिकाणी कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. मुख्यमंत्र्यांनी आयुक्तपदी कार्यकक्षम अधिकारी नेमले आहेत. हे कार्यक्षम अधिकारी असतानाही राज्यात खून होत आहेत. राजकीय कार्यकर्त्यांचे खून होत आहेत. व्यापाऱ्यांवर गोळीबार होत आहे. न्यायालयाच्या आवारात घुसून एका व्यक्तीवर गोळीबार केला. त्याचे हात तोडले जातात आणि वकील पाहतात. मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री म्हणतात हे खपवून घेतलं जाणार नाही. काय खपवून घेतलं जाणार नाही? तुमचं अडीच तीन वर्ष सरकार आहे. पोलीस काय करतात? पोलीस राजकीय नेत्यांना नोटीस पाठवत आहेत. आम्ही सोशल माध्यमांवर जे लिहितोय त्यावर लक्ष ठेवतात. तरुण आंदोलकांना नोटिस बजावल्या जात आहेत. अशी फडतूस कामे पोलीस करत आहेत. रस्त्यावर खून होतात, अपहरण होतात. पोलिसांचं लक्ष नाही. पुणे हे विद्येचं माहेरघर होतं. आता गुंडांचं माहेरघर झालं आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Loading...

ज्यांच्याकडे गृहखातं, तेच अपयशी

ज्याच्याकडे गृहखातं आहे. तेच अपयशी आहेत. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अशी अनेक प्रकरण मुंबई, पुणे आणि ठाण्यात घडत आहेत. राज्याचे गृहमंत्री मजेत इकडे तिकडे फित कापत फिरत आहेत. पूर्णेकरांची हत्या झाली. काय केलं पोलिसांनी? पोलिसांना पुरावे देऊनही काही होत नाही. अशाने गुंडांचं बळ वाढणार नाही का? गुंडांनी एक समांतर न्याय व्यवस्था तयार केली आहे. कारण त्यांचे संरक्षक सरकारमध्ये आहे. तुम्हाला हे एकदोन प्रकरण हे हायप्रोफाईल आहे म्हणून दिसतात. पण अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ सुरू आहे. आता जुने आकडे काढतील महाविकास आघाडीच्या काळात अमूक झालं. पण आता तुम्ही आहात ना सत्तेत. तुमच्या हातात पोलीस यंत्रणा आहे ना? मग गुन्हे घडतात कसे? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

नागपुरात कायदा सुव्यवस्था आहे का?

मुख्यमंत्र्यांनी पालकत्त्व घ्यावं, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यावरही राऊत यांनी भाष्य केलं. पुण्याच्या पालकमंत्री कोण आहेत? नागपूरलाही असं वातावरण आहे. गृहमंत्रालय अपयशी आहे. मुख्यमंत्र्यांकडे ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे. तिथे कायदा सुव्यवस्था आहे का? नाहीये. कायदा आणि सुव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची परिस्थिती संपूर्ण राज्याची आहे. या गुंड टोळ्यांच्या मदतीने भाजप जिंकतो. यांनाच समाजसेवा करण्याची संधी दिली जाते. यातील काही लोक बुक फेस्टिव्हलमध्ये जातात. हातात पुस्तक घेतात, असा टोला त्यांनी लगावला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us