मोठी बातमी ! पूर्णेकरांचे मारेकरी शिंदे गटाच्या नेत्याच्या बिल्डिंगमध्ये… संजय राऊत नेमकं काय म्हणाले? मोठी खळबळ
ठाण्यात ठाकरे गटाचे प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी मोठी खळबळ उडाली आहे. पूर्णेकरांच्या मुलाने मारेकऱ्यांचा शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्या निवासस्थानाशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. संजय राऊतांनी या प्रकरणाला राजकीय वळण देत, शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत.

ठाकरे गटाचे ठाण्याचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांचा दोन दिवसापूर्वी खून झाला. त्यामुळे ठाण्यात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणात पूर्णेकर यांचे चिरंजीव राम पूर्णेकर यांनी शिंदे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राम यांच्या आरोपानंतर पोलिसांनी पुरवणी एफआयआरमध्ये मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या नावाचा समावेश केला आहे. दोन दिवसांपूर्वी मारेकरी मिनाक्षी शिंदे राहत असलेल्या टॉवरमध्ये गेले होतो, असा दावा राम पूर्णेकर यांनी केल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. राऊत यांच्या या माहितीमुळे खळबळ उडाली आहे.
खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे काल ठाण्यात गेले होते. या दोघांनीही पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. राम पूर्णेकर आणि पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. त्यानंतर काल घडलेल्या घटनेची माहिती संजय राऊत यांनी आज मीडियाला दिली. मिनाक्षी शिंदे या गोंधळलेल्या दिसतात. आरोपी नेहमी गोंधळतो. आरोपी जेव्हा गुन्हा करून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा आपण सुरक्षित आहोत अशी खात्री वाटते, तेव्हाच नेमका दुसरा हल्ला होतो तेव्हा तो गोंधळतो. पूर्णेकरांची हत्या ठाण्यात झाली. त्यांच्यावर सात राऊंड फायर झाल्या. राजकीय वादातून झालेला हा खून आहे, असं संजय राऊत म्हणाले.
तो राम पूर्णेकरांचा आरोप
मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचं पुरवणी एफआयआरमध्ये नाव आलं आहे. याची पार्श्वभूमी काय आहे? याची पार्श्वभूमी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे नाही. आम्ही तिथे गेलो. पोलीस स्टेशनला थांबलो. पोलीस आयुक्तांना भेटलो. पूर्णेकरांचा मृतदेह रुग्णवाहिकेत होता. हजारो शिवसैनिक त्या ठिकाणी जमले होते. राम पूर्णेकर यांनी पोलिसांना प्रत्यक्षात काय घडलं याची माहिती दिली आहे. पूर्णेकर यांच्या मते, मिनाक्षी शिंदे राहत असलेल्या निलकंठ टॉवरमध्ये दोन दिवसा आधी हल्लेखोरांना जाताना त्यांना पाहिलं होतं. हा आरोप माझा नाहीये. तर प्रदीप पूर्णेकर यांच्या चिरंजीवाचा आहे, असं संजय राऊत म्हणाले.
आकांडतांडव करू नका
हत्येतील आरोपी आणि राजेंद्र शिंदे यांची जवळीक होती, असं राम पूर्णेकर यांनी सांगितलं. त्यांनी आरोपींचे आणि राजेंद्र शिंदे यांचे फोटो पोलिसांना दाखवले. हा संशय खरा वाटत नाही का? पुरावे आहे. पूर्णेकरांची स्टेटमेंट आहे. पुरवणी एफआयआरला त्यांची स्टेटमेंट जोडली गेली आहे. हा संजय राऊत किंवा आदित्य ठाकरेंचा आरोप नाही. पूर्णेकरांच्या चिरंजीवांचा आहे. मिनाक्षी शिंदे यांनी समजून घ्यावं. आणि आकांडतांडव करू नये, असं राऊत यांनी सांगितलं.
बीडपेक्षा वाईट अवस्था
पूर्णेकर यांच्या हत्येमागे स्थानिक राजकीय गट आहे. पूर्णेकरांनी ड्रग्स टोळीविरोधात आघाडी उघडली होती. एकनाथ शिंदे आणि बिल्डरांचं प्रेम असलेल्या कलस्टर विरोधात आघाडी उघडली होती. त्यांनी मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक लढवली होती. या गुन्ह्यात आपलं आणि आपल्या पतीचं नाव का येतं? हे मिनाक्षी शिंदेंनी समजून घ्यावं. दादागिरीचा अंत होतो. फार काळ दादागिरी चालत नाही. पूर्वी महाराष्ट्रात भाई होते. आज ते कुठे गेले? आज ठाण्याची अवस्था बीडपेक्षा वाईट आहे. दुर्देवाने तसं म्हणावं वाटतं. बीडमध्ये खून होतात. दडवले जातात. वाल्मिक कराडसारखे लोक तयार होतात. सुशिक्षित ठाण्याची अवस्था आज तशी झाली आहे. हे फडणवीस यांना माहीत नसेल तर ते अपयशी गृहमंत्री आहेत, असा हल्ला त्यांनी केला.
केळकरांना आवाज उठवावा
संजय केळकर सुशिक्षित आहेत. संघाच्या मुशीतून तयार झाले आहेत. त्यांनी तरी या प्रकरणावर आवाज उठवावा. भाजपच्या उपमहापौरांनी पोलिसांना पत्र दिलं आहे. चौकशीची मागणी केली आहे. आम्ही जिथे बोट दाखवत आहोत, तिथेच त्यांनी बोट दाखवलं आहे. तुम्ही त्यांचं पत्र वाचा, असंही ते म्हणाले.
पोलिसांचं वचन
आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, उपायुक्त प्रशांत कदम आणि दुबे हे तीन प्रमुख अधिकारी उपस्थित होते. त्यानंतरही पुरवणी एफआयआरमध्ये मिनाक्षी शिंदे यांची नावं आली. तपासात कोणताही दबाव येऊ देणार नाही. कायदेशीर मार्गाने तपास करू. कुणालाही सोडणार नाही हे वचन या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलं. पोलीस आयुक्तांनी तपास योग्य दिशेने सुरू आहे. दोघांना अटक झाली आहे. कोर्टात प्रकरण टिकेल असं करू, असं सांगितल्याचंही राऊत म्हणाले.