Mumbai Local : मुंबईत रेल्वे स्थानकांच्या अनाऊन्समेंट स्पीकरवर जोरजोरात छटपूजेची गाणी वाजवण्याचे आदेश, मनसे काय भूमिका घेणार?

मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर छटपूजेच्या गाणी वाजवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवा वादाला तोंड फुटलं. आता मुंबईत मनसे काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागलं आहे.

Mumbai Local : मुंबईत रेल्वे स्थानकांच्या अनाऊन्समेंट स्पीकरवर जोरजोरात छटपूजेची गाणी वाजवण्याचे आदेश, मनसे काय भूमिका घेणार?
mumbai fire
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 12, 2026 | 8:25 AM

दिवाळीनंतर आता देशभरात छटपूजा साजरी होणार आहे. आता मुंबईतही जागोजागी छटपूजा केली जाते.  परंतु   गिरगाव चौपाटीवर छटपूजेचा कार्यक्रम आयोजित करण्यास मुंबई हायकोर्टाने परवानगी देण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर गिरगाव चौपाटीऐवजी अन्य पर्यायी छटरपूजा आयोजित करण्यास जागा उपलब्ध करून देण्याबाबतही कोर्टाने आदेश देण्यास नकार दिलाय. कोर्टाने परवानगी नाकारल्यानंतर आता मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर थेट छटपूजेची गाणी वाजण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकारावर काही संघटनांनी आक्षेप घेतला. या प्रकाराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

मुंबईत हार्बर मार्गावरील वडाळा, नेरूळ यासह अनेक रेल्वे स्थानकांवर आज उद्घोषणा थांबवून छटपूजेची गाणी मोठ्या आवाजात वाजवण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या प्रकारावर  स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीने फेसबुक पोस्ट करत आक्षेप घेतला. याबाबत स्टेशन व्यवस्थापनाकडे विचारणा करण्यात आली असता, आम्हाला छटपूजेपर्यंत दररोज अशी गाणी लावण्याच्या सूचना वरून असल्याचे उत्तर देण्यात आलं. रेल्वे स्थानकावर होणाऱ्या उ‌द्घोषणा या गाड्यांचे आगमन-प्रस्थान, वेळापत्रक, फलाटातील बदल तसेच आपत्कालीन सूचना देण्यासाठी असतात. मात्र, बुधवारी वडाळा रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठीच्या नियमित उद्घोषणा बंद करून त्याऐवजी चक्क मोठ्या आवाजात छटपूजेची गाणी वाजवण्यात आली. यावर फेसबुकवरही काही प्रवाशांनी याबाबत पोस्ट केल्या आहेत. नेरूळ स्टेशनवरही असाच प्रकार घडला.

Loading...

मुंबईत भाऊबीजेच्या दिवशी मध्य रेल्वेच्या आंबिवली स्थानकावर भोजपुरी गाणी वाजवण्यात आली. मराठी सणाच्या दिवशी भोजपुरी गाणी वाजवल्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  महाराष्ट्राच्या सणाला मराठी गाणी सोडून भोजपुरी गाण्यांचा आग्रह कशासाठी, असा सवाल करण्यात आला आहे.  महाराष्ट्राला बिहार-यूपीत नेऊन ठेवलं का? असं म्हणत मराठी माणसांकडून संताप व्यक्त केला जात आहे. बदलापुरातही उल्हास नदीवर छटपूजा करण्यास विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष मनसेच्या भूमिकेकडे लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us