Rohit Pawar: राज ठाकरेंनी दुसऱ्या पक्षाचं ऐकून स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवू देऊ नये; रोहित पवार यांचा खोचक सल्ला

स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना राष्ट्रवादीने सर्वात पहिला पाठिंबा दिला आहे. यावरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Rohit Pawar: राज ठाकरेंनी दुसऱ्या पक्षाचं ऐकून स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवू देऊ नये; रोहित पवार यांचा खोचक सल्ला
राज ठाकरेंनी दुसऱ्या पक्षाचं ऐकून स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवू देऊ नये; रोहित पवार यांचा खोचक सल्ला
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 17, 2022 | 12:35 PM

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) आज पुण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी राज ठाकरे यांना खोचक सल्ला दिला आहे. राज ठाकरे हे स्वत: एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे राज्यात कुठेही जाऊन ते त्यांचा पक्ष वाढवू शकतात. त्यांना पक्ष वाढीचा अधिकार आहे. मात्र, दुसऱ्या पक्षाचं ऐकून राज ठाकरे भाषण करत असतील तर त्यांनी स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवू देऊ नये. त्यांची ओरिजिनॅलिटी कुठे तरी हरवत आहे. ती त्यांनी जपली पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं, असा खोचक सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचंही त्यांनी समर्थन केलं. ते स्वत: त्यांचे बंधू आहेत. आमच्यापेक्षा ते जास्त त्यांच्या जवळचे राहिले आहेत. त्यांच्याबद्दल त्यांना जास्त गोष्टी माहीत असाव्यात. त्यामुळेच त्यांनी ते विधान केलं असावं. ते त्यांचं व्यक्तिगत विधान आहे, असंही रोहित पवार म्हणाले.

स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना राष्ट्रवादीने सर्वात पहिला पाठिंबा दिला आहे. यावरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी राष्ट्रवादीची भूमिका सांगणार नाही. पण माझी वैयक्तिक भूमिका सांगायची झाली तर मला असं वाटते की त्यांना समर्थन दिले पाहिजे. जेव्हा ते भाजप पुरस्कृत राज्यसभेवर गेले होते आणि मराठा आरक्षणाचा विषय पार्लमेंटमध्ये मांडायचा होता. तेव्हा त्यांना एक मिनिटं बोलायला सुद्धा तेव्हा स्पीकरने दिला नाही. त्यावेळी संजय राऊत साहेबांनी भांडून त्यांना पाच-सात मिनिटे बोलण्याची संधी दिली, असं रोहित पवार म्हणाले.

ते आता कॉमन झालंय

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ति चिदंबरम यांच्या घरावर धाडी मारण्यात आल्या आहेत. मुंबईतही त्यांच्या घरावर छापे मारले आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकारविरोधात जो कोणी बोलतो. त्याच्या घरावर छापे पडतात. सीबीआय आणि ईडीने जे 1600 छापे मारले आहेत. त्यात भाजपचे किती लोक आहेत? 1600 धाडींपैकी 95 टक्के छापे भाजपच्या काळात पडले आहेत. भाजप सीबीआय आणि ईडीचा वापर करतं. भाजपविरोधात बोललं की छापे पडणं हे आता कॉमन झालं आहे, असंही त्यांनी सांगितलं.