
आजारी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तो व्यक्ती लवकर बरा कसा होईल याकडे डॉक्टर आणि रुग्णालयाचे लक्ष असते. आता एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील एका रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा हात चक्क उंदराने कुरतडला आहे. या घटनेमुळे रुग्णालयाच्या हलगर्जी कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
मिरा-भाईंदर शहरातील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) स्वच्छता आणि रुग्ण सुरक्षा यांचा पूर्ण अभाव असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या ८९ वर्षीय वृद्ध महिलेच्या हाताला रात्री उंदराने कुरतडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
सुहासिनी दामोदर माठेकर (वय ८९) या वृद्ध महिलेला आरोग्यविषयक तक्रारींमुळे १२ मार्च २०२६ रोजी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करून व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. रात्रीच्या वेळी आयसीयूमध्येच उंदराने सुहासिनी माठेकर यांच्या हाताला कुरतडले. सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास नातेवाईक भेटायला आले तेव्हा त्यांच्या हातावर जखमा दिसल्या आणि उंदीर जवळून पळून गेल्याचे त्यांना दिसले. यावेळी ड्युटीवर असलेल्या डॉक्टर व नर्सेस यांना याची जाणीव झाली नसल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे.
कुटुंबीयांनी सांगितले की, “आमची आजी मृत्यूशी झुंज देत आहे. तिला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे तरीही आयसीयू सारख्या संवेदनशील विभागात उंदीर फिरत असतील तर रुग्णालयात स्वच्छता कुठे आहे? रात्रीच्या ड्युटीत कोणाचेच लक्ष नव्हते का?” या घटनेने कुटुंबीयांसह नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर आरोप
ही घटना केवळ एक अपघात नसून, रुग्णालयातील सततच्या हलगर्जीपणाचा आणि स्वच्छतेच्या अभावाचा भाग असल्याचे दिसून येत आहे. मिरा-भाईंदरमधील एकमेव मोठ्या सरकारी रुग्णालयात पूर्वीही मनुष्यबळाच्या कमतरता, डॉक्टरांच्या गैरहजेरी आणि स्वच्छता संबंधित तक्रारी सातत्याने समोर येत होत्या.