
संदिप राजगोळकर, मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ ट्विट केलाय. संबंधित व्हिडीओ हा महाविकास आघाडीचा काल मुंबईत निघालेल्या महामोर्चाचा असल्याचा दावा त्यांनी केला. पण संबंधित व्हिडीओ हा 2017 साली मुंबईत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाचा आहे, अशी माहिती समोर आलीय. त्यामुळे या व्हिडीओवरुन माजी खासदार संभाजीराजे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय. “ज्या मुका मोर्चा हिणवले आणि तोच मोर्चा स्वत:च्या राजकारणासाठी वापरत आहात”, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी संजय राऊतांची कानउघाडणी केलीय.
“संजय राऊत, ज्या मोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणून हिणवले तोच मराठा क्रांती मोर्चा आज स्वतःच्या राजकारणासाठी वापरत आहात”, असं उत्तर संभाजीराजे यांनी संजय राऊत यांना दिलंय.
“या मोर्चाची चेष्टा करणारेही तुम्हीच होता. आज नसलेली ताकद दाखविण्यासाठी एकेकाळी ज्या मराठा समाजाला हिणवलं, त्यांचाच मोर्चा वापरताना जरा तरी तमा बाळगा”, अशा शब्दांत संभाजीराजेंनी संजय राऊत यांचे कान टोचले आहेत.
महाविकास आघाडीकडून मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चात जास्त गर्दी नसल्याचा दावा करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नॅनो मोर्चा म्हणत विरोधकांची खिल्ली उडवली होती.
देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच!
महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज.
देवेंद्र जी..हे वागणे बरे नाही.
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/DReN1k20LS— Sanjay Raut (@rautsanjay61) December 18, 2022
त्यानंतर आज संजय राऊतांनी मोर्चाचा एक व्हिडीओ ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली. पण संबंधित व्हिडीओ हा मराठा मोर्चाचा असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं.