
दोन्ही पवार एकत्र येण्याला राष्ट्रवादीतूनच विरोध असल्याचा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला. राष्ट्रवादीतील दोन गट एकत्र येण्याची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. पवार काका पुतण्या हे एकत्र येऊ नयेत यासाठी दोन बड्या नेत्यांचा विरोध असल्याचा मोठा दावा राऊतांनी आज घेतलेल्या पत्र परिषदेत केला. त्यांनी या दोन्ही नेत्यांची नावे घेतली. त्यामुळे आता राष्ट्रवादीतच नाही तर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
तटकरे आणि पटेलांचा विरोध
अजित पवार गटाचे अध्यक्ष सुनील तटकरे तर बडे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. या दोघांच्या विरोधामुळेच हे दोन्ही गट, पवार एकत्र येत नसल्याचा आरोप राऊतांनी केला. राऊतांच्या आरोपांमुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.
“शरद पवार यांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष सुरू आहे असे म्हणतात. आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असेही सांगतात. आपण एकत्र आलो पाहिजेत असे ही म्हणतात. आणि जेव्हा ती वेळ येते, तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाहीत. म्हणजे मोदी आणि शाह यांच्या मुख्य दुकानासोबत त्यांना त्यांचे छोटे दुकान चालवायचे आहे. जो तो आपआपला राजकीय फायदा आणि तोटा पाहत असतो. प्रफुल्ल पटेल हे काही महान नेते नाहीत, हे सगळ्यांना माहिती आहे. तर आता तटकरे हे एका गटाचे अध्यक्ष आहेत. हा पक्ष विलीन व्हावा अशी मागणी असली तरी तो होणार नाही, अशी माझी माहिती आहे. एकत्र आले तर अध्यक्ष बदलावा लागेल, मग तटकरेंनी काय करायचं हा एक प्रश्न आहे. केंद्रातील मंत्रिपदाचा प्रश्न निर्माण होईल. प्रत्येक जण आपली व्यवस्था, आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहत असतो. तसं याचं आहे,” असे राऊत म्हणाले.
गटाराचे पाणी कोण पिणार?
कालही खासदार संजय राऊत यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाविषयी वक्तव्य केले होते. त्यावरून काहूर उठले होते. तहान लागली असली तरी गटारीचे पाणी कुणी पित नाही अशी टीका त्यांनी काल केली होती. सुप्रिया सुळेंचे नाव वारंवार घेण्यात येते किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेण्यात येतात. त्यांना तहान नक्कीच लागली असेल. पण तहान लागल्यावर गटाराचं गढूळ पाणी कुणी पित नाही, असा टोला राऊतांनी सुळे यांच्या भाजपाच्या वाटेवर असल्याच्या प्रश्नावर लगावला होता.
महिला आयोगावर अराजकीय व्यक्ती नेमा
महिला आयोग तो राज्याचा आयोग किंवा राष्ट्रीय असेल, महिला आयोगाच्या अध्यक्षपदी किंवा सदस्यपदी नॉन पॉलिटिकल व्यक्ती असायला पाहिजे. राजकारणातील सोय म्हणून जर कोणी या पदावर नेमणूक करत असेल तर महिलांना न्याय मिळणार नाही. केंद्रात आणि राज्यात राजकीय व्यक्तीच आहे. राज्य महिला आयोग म्हणजे महिला आर्थिक विकास महामंडळ नाही. हे एक घटनात्मक पद आहे. त्यामुळे राज्यातील, देशातील महिलांच्या अत्याचारांना वाचा फुटते. पण आपण काय करतो नेत्याच्या जवळच्या व्यक्तीला त्या पदावर बसवतो. राजकीय सोय असते. कॅबिनेटचा दर्जा देतो. हे चुकीचं आहे. नॉन पॉलिटिकल व्यक्ती, अराजकीय व्यक्ती त्या पदावर पाहिजे आणि सदस्यही तसेच पाहिजे, अशी मागणी राऊतांनी केली.
आम्ही तयारीला लागलो
महापालिका निवडणुकीत भाजपाकडून स्वबळाचे संकेत असल्याबाबत त्यांना विचारले असता, त्यांनी स्वबळावर लढावं किंवा एकत्र लढावं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या तयारीला लागलो आहोत, असे राऊत म्हणाले.
शरद पवार हे मोठेच
शरद पवार हे या सर्वांपेक्षा मोठे आहेत. देवेंद्र फडणवीस असतील शिंदे असतील. त्यांच्या कौतुकाने पवार मोठे होत नाहीत. ते मोठेच आहेत. पहाड आहे तो. सह्याद्री आहे. असं म्हटल्यावर देवेंद्र कौतुक करताय किंवा अमूक कोणी करताय याने त्यांची उंची वाढत नाही. ते टोलेजंग व्यक्तिमत्व आहे, अशी पुस्ती राऊतांनी जोडली.