मोदी-शहांचा उदय होताच शिवसेना नकोशी का झाली?, तेव्हा पूनम महाजन निर्भयपणे का बोलल्या नाहीत?: राऊत

| Updated on: Jan 30, 2022 | 5:01 PM

भारतीय जनता पक्षात मोदी-शहांचा उदय होताच शिवसेना नकोशी व्हावी याचे रहस्य काय?, असा सवाल करतानाच पूनम महाजन म्हणतात त्याप्रमाणे, महाजन-ठाकरे या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी केलेली युती 2014 साली तुटली.

मोदी-शहांचा उदय होताच शिवसेना नकोशी का झाली?, तेव्हा पूनम महाजन निर्भयपणे का बोलल्या नाहीत?: राऊत
मोदी-शहांचा उदय होताच शिवसेना नकोशी का झाली?, तेव्हा पूनम महाजन निर्भयपणे का बोलल्या नाहीत?: राऊत
Follow us on

मुंबई: भारतीय जनता पक्षात (bjp)मोदी-शहांचा उदय होताच शिवसेना नकोशी व्हावी याचे रहस्य काय?, असा सवाल करतानाच पूनम महाजन म्हणतात त्याप्रमाणे, महाजन-ठाकरे या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी (hindutva) केलेली युती 2014 साली तुटली. तेव्हाच मर्दानगीच्या मुद्द्यावर प्रमोद महाजन यांच्या कन्येने निर्भयपणे तोंड उघडायला हवे होते, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेकडून (shivsena) युती तुटावी असे कोणतेच अघोरी प्रयोग झाले नाहीत. हिंदुत्ववादी शिवसेनेचे महत्त्व कमी करायचे व अधिकार संपवायचे हे धोरण राबवणारेच भाजपचे आज सूत्रधार आहेत, असा हल्लाही संजय राऊत यांनी चढवला आहे. राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ या सदरातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून ते युती तुटण्याच्या मुद्द्यावरून राऊत यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला आहे.

महाराष्ट्रातील सत्ता भाजपने गमावली आहे. पण राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांचा गोळीबार सुरू आहे. आता त्यांना मुंबईवर कब्जा मिळवायचा आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीचा सौदा करायला ते मोकळे झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 23 जानेवारीच्या भाषणात भारतीय जनता पक्षाबाबत सत्य कथन केले. महाराष्ट्राचे राजकारण आता पूर्ण बदलले आहे. हा बदल पुढची 25 वर्षे राहील असे चित्र आहे. उद्धव ठाकरे यांनी परखडपणे तेच सांगितले आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सीमा लढ्यात जनसंघ नव्हता

यावेळी राऊत यांनी जनसंघ आणि भाजपच्या राजकीय इतिहासावरही प्रकाश टाकला. मूळ जनसंघ 1978 साली जनता पक्षात विलीन झाला. त्यानंतर जनता पक्ष फुटला. जनसंघाने नाव बदलून भारतीय जनता पक्षाचे रूप धारण केले, पण जनसंघ तरी भारतीय राजकारणात फार गाजत वाजत होता असे नाही. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातही जनसंघ दिसला नाही व तिकीट वाटपाचा मुद्दा घेऊन जनसंघ समितीतून बाहेर पडला आणि संयुक्त महाराष्ट्रास अपशकून केला. हा इतिहास आहे. जनसंघाची पणती महाराष्ट्रात कधी पेटलीच नाही हे खरे. पण जनसंघात काही तत्त्वाची व नीतिमत्ता असलेली माणसे होती. महाराष्ट्राच्या सीमा लढ्यातही जनसंघ कधीच हिरीरीने उतरला नाही. भारतीय जनता पक्षाचीही तीच भूमिका आहे. बेळगावातील निवडणुकीत फडणवीस प्रचारासाठी जातात व महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव करा असे सांगतात. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, खडसे हे भाजपचे नेते अशा पद्धतीने वागताना दिसले नाहीत. नितीन गडकरी हे स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते आहेत, पण सीमा भागात जाऊन त्यांनी मराठी संघटनांविरुद्ध प्रचार केला नाही हे सत्यच आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

म्हणून भांडे फुटले नाही

पालिकेची पोटनिवडणूक स्वबळावर स्वतंत्रपणे ठाम अशा हिंदुत्वाच्या भूमिकेवर जिंकल्यावर भाजप- शिवसेना पुढच्या 25 वर्षांसाठी एकत्र आली. ‘तुम्ही संपूर्ण देशावर राज्य करा, फक्त महाराष्ट्र आम्हाला सोडा,’ असे तेव्हा बाळासाहेब ठाकरे वारंवार सांगत होते. खुर्ची आणि जागांवरून आपापसात भांडणे होता कामा नयेत हेसुद्धा बाळासाहेब सार्वजनिक सभांतून बोलत होते. दोन्ही बाजूने समंजस नेतृत्व होते. त्यामुळे भांड्याला भांडे लागले नाही. भांडे फुटले नाही. कोण कोणामुळे वाढले यापेक्षा दोघांनाही एकमेकांचा फायदा झाला हे स्वीकारणे महत्त्वाचे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

 

संबंधित बातम्या:

नॉटी, नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले…अमृता फडणवीसांची 100 मार्कांची प्रश्नपत्रिका

देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही गांधी विचाराने चालेल, कोल्हेंबाबत पटोलेंची भूमिका काय?

Goa Assembly Elections 2022 : उत्पल पर्रिकरांसाठी शिवसेनेची फिल्डिंग, उमेदवारी अर्ज मागे घेणार; भाजपचा गेम होणार?